पुणे : केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविणाऱ्या महायुतीला पश्चिम महाराष्ट्रात ४५ पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी येथे सोमवारी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीवेळी विरोधकांनी राज्यघटना, आरक्षणासंदर्भात खोटे राजकीय कथानक रचले. मात्र, या निवडणुकीत जनतेला हे सत्य कळाले असल्याने विरोधकांची डाळ या निवडणुकीत शिजणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोहोळ यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा – देशात बारामतीची ओळख कोणामुळे? शरद पवार यांनी अजित पवारांना सुनावले

मोहोळ म्हणाले की, जनमताचा अनादर करून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. हे सरकार योजनांना स्थगिती देणारे सरकार ठरले. महाविकास आघाडी आणि जनहिताच्या योजना राबविणारे महायुतीचे सरकार या दोघांचा अनुभव राज्यातील जनतेने घेतला आहे. गेल्या दहा वर्षांत राज्याला दहा लाख कोटी रुपयांहून अधिक निधी प्राप्त झाला आहे. केंद्राच्या माध्यमातून राज्यात लोककल्याणकारी योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे जनेतेचे मत विकासाला असेल.

हेही वाचा – क्रीडा क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणींना हा त्रास होऊ नये – विनेश फोगट

अनैसर्गिक आघाडी करून सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने केवळ योजनांना स्थगिती देण्याचे काम केले. लोकसभा निवडणुकीवेळी विरोधकांनी राज्यघटना बदल, आरक्षण रद्दबाबत खोटे संदेश पसरविले. मात्र, महाविकास आघाडीचा हा खोटेपणा राज्यातील जनतेच्या लक्षात आला असल्याने या निवडणुकीत महायुतीला जास्त जागा मिळतील. पश्चिम महाराष्ट्रातील ५८ पैकी महायुतीचे ४२ आमदार आहेत. या निवडणुकीत ४५ पेक्षा जास्त जागा महायुती घेईल, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murlidhar mohol claim about mahayutt seats in western maharashtra pune print news apk 13 ssb