किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका सरस्वती राणे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त सरस्वती राणे स्मृती समितीतर्फे रविवारी (५ जून) विशेष संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.
टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या समारोहामध्ये सरस्वती राणे यांची नात आणि प्रसिद्ध गायिका मीना फातर्पेकर या ‘स्वरवेल’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. किराणा घराण्यातील कलाकारांच्या कर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमात दुर्मीळ ध्वनिमुद्रणांचा समावेश आहे. ज्येष्ठ संवादिनीवादक पं. तुळशीदास बोरकर यांचा ‘पद्मश्री’ किताब मिळाल्याबद्दल विशेष सत्कार व त्यांचे संवादिनीवादन होणार आहे. ग्वाल्हेर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका कल्पना झोकरकर यांच्या गायनाची मैफल होणार आहे. किराणा, ग्वाल्हेर आणि जयपूर अशा तीन घराण्यांची तालीम मिळालेल्या सरस्वतीबाई राणे या भारतीय चित्रपटासाठी पाश्र्वगायन करणाऱ्या पहिल्या अभिजात मराठी कलाकार आहेत. शास्त्रीय संगीताबरोबरच नाटय़संगीत, भावगीत आणि चित्रपटगीते या क्षेत्रातही त्यांचे योगदान मोलाचे आहे. देशभरातील सर्व संगीत समारोहांमध्ये गायन सादर करीत सरस्वतीबाई यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त नऊ वर्षांपासून संगीत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा