पुणे : महान आणि प्रतिभावान कलाकार असलेल्या प्रभा अत्रे या सतत गायन, अन्य कलाकारांचे श्रवण, अभ्यास आणि लेखनामध्ये व्यग्र असत. संगीत हेच प्रभाताईंचे पहिले प्रेम होते, अशी भावना ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांनी शनिवारी व्यक्त केली. ज्यांच्याकडून विद्या मिळवावी, ज्यांना गुरूस्थानी मानावे असे कलाकार आता फार कमी राहिलेले आहेत, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
डॉ. प्रभा अत्रे शिष्य परिवारातर्फे आयोजित कार्यक्रमात डाॅ. प्रभा अत्रे लिखित ‘स्वरमयी’ पुस्तकाच्या पाचव्या आणि ‘सुस्वराली’ या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन चौरासिया यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. अशोक वळसंगकर, डॉ. मदन फडणीस, ॲड. किरण कोठाडिया, फाऊंडेशनचे कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे, डॉ. मनीषा रवी प्रकाश या वेळी उपस्थित होते. ज्येष्ठ कवी-समीक्षक डॉ. अशोक वाजपेयी दृकश्राव्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते. डॉ. प्रभा अत्रे यांनी भारतीय संगीतविषयक केलेल्या व्याख्यांनाचा समावेश असलेल्या ‘आलोक’ या १९ भागांच्या दृकश्राव्य मालिकेच्या इंग्रजी आवृत्तीचे लोकार्पण या प्रसंगी करण्यात आले.
हेही वाचा – पितृपंधरवड्यात भाज्या महाग
प्रभाताई आकाशवाणीमध्ये निर्मात्या म्हणून काम करत होत्या त्यावेळी मी स्टाफ आर्टिस्ट होतो. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नाते होते. त्या सुगम संगीत छान गात असत. पण, मैफलीमध्ये शास्त्रीय संगीताचे कलाकार म्हणूनच त्यांनी आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता, अशा आठवणींना चौरासिया यांनी उजाळा दिला.
हेही वाचा – पुण्याला मिळणार मोठा मान… जानेवारीमध्ये लष्कराचा महत्त्वाचा कार्यक्रम
डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम. डी. यांनी फाऊंडेशनच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली. प्रसाद भडसावळे यांनी आभार मानले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले. उत्तरार्धात डॉ. प्रभा अत्रे यांच्या पुस्तकांमधील निवडक सांगीतिक लेखांचे अभिवाचन आणि त्यांनी रचलेल्या वेगळ्या घाटातील बंदिशींवर आधारित सांगीतिक सादरीकरण झाले. यात डॉ. चैतन्य कुंटे, डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी तसेच डॉ. प्रभा अत्रे यांचे शिष्य डॉ. चेतना पाठक, डॉ. अतिंद्र सरवडिकर यांचा सहभाग होता. त्यांना लीलाधर चक्रदेव (संवादिनी) आणि माधव मोडक (तबला) यांनी साथसंगत केली.