संगीत रंगभूमी ही आपल्या संस्कृतीची मूळं असून ऋतुचक्राच्या नियमाप्रमाणे काही काळ ती सुप्तावस्थेत आहेत. मात्र, याच ऋतुचक्राप्रमाणे संगीत रंगभूमीला पुन्हा नवी पालवी फुटेल, अशी भावना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी व्यक्त केली.
बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे प्रभू यांच्या हस्ते नागपूर येथील गायिका डॉ. कल्याणी देशमुख यांना बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार अध्यक्षस्थानी होते. उमा प्रभू, मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर आणि कार्याध्यक्ष नाना कुलकर्णी या प्रसंगी उपस्थित होते. मंडळाच्या ‘रंगबहार’ या स्मरणिकेचे प्रकाशन प्रभू यांच्या हस्ते झाले.
प्रभू म्हणाले, संगीत रंगभूमीने आपल्याला दिग्गज कलाकार दिले आहेत. बालगंधर्व यांच्या निधनाला आणखी दोन वर्षांनी ५० वर्षे होतील. त्यांचे नाव घेतल्यानंतर आपण केवळ नतमस्तक होतो. त्यांच्यानंतर तीन पिढय़ांवरही बालगंधर्व यांची मोहिनी कायम आहे. त्यांच्यानंतरही अनेकांनी संगीत रंगभूमी जिवंत ठेवली. सध्या काहीशी लुप्त झाल्यासारखी दिसत असली तरी संगीत रंगभूमीला पुन्हा चांगले दिवस येतील. कितीही भौतिक प्रगती झाली तरी माणूस आत्मिक आनंदासाठी संस्कृतीशी जोडून घेतो. संगीत रंगभूमी ही संस्कारातून जोपासलेली संस्कृती आहे.
डॉ. विकास कशाळकर यांना अण्णासाहेब किलरेस्कर पुरस्कार, पं. सुहास व्यास यांना गायनाचार्य भास्करबुवा बखले पुरस्कार, तबलावादक नितीन दिवाकर यांना डॉ. सावळो केणी पुरस्कार, राम शीलकर यांना गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार, गायिका अर्चना कान्हेरे यांना काकासाहेब खाडिलकर पुरस्कार, बाळ चितळे यांना खाऊवाले पाटणकर पुरस्कार प्रदान करण्यात आले. उल्का घोडेकर आणि विवेक काटकर यांना द. कृ. लेले पुरस्कार प्रदान करण्यात आला. कल्याणी देशमुख आणि मुजुमदार यांनी मनोगत व्यक्त केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा