मध्यवर्ती पुण्यातून नदीवरचा एखादा पूल ओलांडून डेक्कन जिमखाना भागात शिरल्यावर एकदम वेगळं पुणं दिसायला लागतं. प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, डेक्कन जिमखान्याचं मैदान, क्लब, पीवायसी हिंदू जिमखाना क्लब अशा भागांतून फिरताना श्रीमंत झाल्यासारखं वाटतं. ही केवळ भौतिक श्रीमंती नाही. म्हणजे, तसे अनेक बंगले पडून आता तिथं उभ्या राहिलेल्या ‘पुनर्विकसित’ बोजड इमारती सौंदर्यशास्त्राच्या कोणत्या नियमात बसवायच्या, असा प्रश्न एखाद्या कलासक्त माणसाला पडतो हे खरं; पण तरी थोडेसे का असेना, अजून टिकून असलेले सुबक, रेखीव बंगले, त्यातल्या बागा, झाडं ही श्रीमंती ऐहिक श्रीमंतीच्या पलीकडची आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणि, या सगळ्याला अजून झळाळी आणणारी आणखी एक श्रीमंती आहे, ती ज्ञान आणि कलेच्या संचिताची. डेक्कन जिमखाना परिसरात फिरताना गल्ली-बोळात एक तरी इमारत अशी भेटते, ज्याचा दर्शनी भाग नीट न्याहाळला, तर तेथे नीलफलक लावलेला दिसतो. तो वाचला, की लक्षात येतं, या जागेत कोण राहून गेले आहेत! नीलफलक ही त्यांची आताच्या काळात जपलेली आठवणखूण. त्यावरची नावं पाहिली, की आपण त्या इमारतीपुढे नतमस्तक होत जातो. रँग्लर र. पु. परांजपे, पं. वसंतराव देशपांडे, पं. रोहिणी भाटे, हिराबाई बडोदेकर आणि आणखीही बरीच नावं नीलफलकांवर दिसत राहतात. असंच एक महत्त्वाचं नाव शिरोळे रस्ता संपताना सन्मान हॉटेलला लागून असलेल्या एका बंगल्याबाहेरच्या नीलफलकावर दिसतं, रामचंद्र नरहर चितळकर अर्थात सी. रामचंद्र यांचं. हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील एक श्रेष्ठ संगीतकार. त्यांना जाऊनही आता चार दशकं उलटून गेली, पण काळाच्या पुढचं संगीत देणारा हा अस्सल मराठी माणूस त्याच्या गाण्यांतून आपल्यात उरला आहे, रुजला आहे. त्यांचं ‘ए मेरे वतन के लोगों…’ लागलं नाही, असा एकही स्वातंत्र्यदिन वा प्रजासत्ताकदिन नसतो. तसंच, कदाचित त्यांची गाणी आहेत, हे माहीत नसेल, पण ‘अलबेला’तल्या गाण्यांच्या अनेक आवृत्त्या आजही आजचं संगीत असल्यासारख्या आजच्या तरुण पिढीकडून ऐकल्या जातात आणि एकविसाव्या शतकातली दोन दशकं उलटून गेल्यावर निर्माण होणाऱ्या ओटीटीवरील सिनेमातही पात्रस्थिती दर्शविण्यासाठी (आठवा : ‘नेटफ्लिक्स’वरचा पंकज त्रिपाठी, अभिषेक बच्चनचा ‘ल्युडो’) वापरल्या जातात, हे सी. रामचंद्र यांचं कालसुसंगत्व आहे.

त्यांची विशेषत्वानं आठवण होण्याचं कारण म्हणजे त्यांच्या वापरातला एक पियानो गेल्याच रविवारी राजा दिनकर केळकर संग्रहालयात सुपूर्द झाल्याचा कार्यक्रम. सी. रामचंद्र यांनी ज्या पियानोवर चाली रचल्या, ज्यावर सरगम छेडताना ते तल्लीन झाले, जो पियानो अगदी अलीकडे नव्या पिढीतल्या काही भाग्यवान सूरसाधकांनाही त्याच्यावर बोटे फिरवू देत होता, तो केळकर संग्रहालयात दाखल झाला. सी. रामचंद्र यांचं निधन झाल्यावर हा पियानो, त्यांच्या इच्छेनुसार ज्येष्ठ सॅक्सोफोन व क्लॅरिनेटवादक सुरेश यादव यांच्याकडे सी. रामचंद्र यांच्या पत्नी बेन यांच्याकडून सुपूर्द करण्यात आला होता. यादव यांनी या पियानोचा चार दशकं मायेनं सांभाळ केला. ही माया इतकी, की हा पियानो खरेदी करण्यासाठी अनेकजण भल्या मोठ्या रकमा घेऊन यादव यांच्या दारात येऊन उभे राहिले, तरी त्यांनी तो कुणालाही दिला नाही.

यादव सी. रामचंद्र यांच्या वाद्यवृंदात सॅक्सोफोन आणि क्लॅरिनेट वाजवायचे. ते सांगतात, ‘अण्णांचा माझ्या वादनावर एवढा जीव, की काही कारणांनी मला एकदा सलग काही काळ त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होता आलं नाही, तर अण्णा रुसून गेले. तू आला नाहीस, तर मी कार्यक्रम बंद करीन, असा निरोप पाठवल्यावर मी हडबडून गेलो. जाऊन अण्णांना म्हणालो, ‘मी मानधन न घेता वाजवीन, पण असं काही करू नका.’ अण्णा आजारी असतानाच त्यांनी त्यांचा लाडका पियानो माझ्याकडे द्यायची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे हा पियानो माझा जीव, की प्राण होता. माझी मुलंही यावर वादन शिकली. आता मात्र माझ्याच्याने नीट देखभाल होत नाही, तेव्हा तो चांगल्या हाती सुखरूप राहावा, म्हणून केळकर संग्रहालयाकडे सुपूर्द केला…’

बेगडी जगणाऱ्या माणसांच्या दुनियेत हे असंही सगळं घडतं, म्हणून ही गोष्ट सांगावीशी वाटली. संगीतकाराच्या चालींचा पहिला श्रोता बनून, त्याच्या प्रतिभेचे अलंकार अंगाखांद्यावर वागविणाऱ्या वाद्याचं पैशांत मोल करता येत नाही; कारण ते केवळ वाद्य नाही, तर त्या काळाचं, त्या काळातील संगीताचं संचित असतं. या संचिताचं महत्त्व जाणणारा आजच्या काळातला कुणी ते जिवापाड जपतो, हे ही कहाणी सांगण्याचं प्रांजळ प्रयोजन. डेक्कन जिमखाना परिसरात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या इमारतींच्या पुनर्विकासात काही नीलफलक आता गायब झाले आहेत. काही फलक पुसट झाल्यानं नावांची अक्षरंही विरू लागली आहेत.

आपल्या संचिताबद्दल आपल्याला किती आस्था आहे, याचं हे दर्शन! पण, विशेष म्हणजे जे काही जुने बंगले टिकून राहिले आहेत, त्यात सी. रामचंद्र यांचा बंगला विशेष प्रेमानं जपला जातो आहे. त्यावरचा नीलफलकही ताजा दिसतो आणि बंगल्यासमोरची हिरवळही. दिवेलागणीच्या वेळी त्या बंगल्यात दिवे उजळले, की वाटत राहतं, आता आतून एकदम ‘शाम ढले, खिडकी तले’चे सूर ऐकू येतील. नंतर एकदम द्रुत लयीत ‘अपलम चपलम’ सुरू होईल आणि मग ‘ये जिंदगी उसी की है’नं काळीज पिळवटेल… निगुतीनं आठवणी जपल्या, की त्या अशा ताज्या राहतात. आपल्या शहराला इतकं कळलं, तरी पुरेसं आहे. कारण, सी. रामचंद्र यांचा पियानो त्यांच्या पश्चात मुंबईत राहणारे सुरेश यादव यांनी आता केळकर संग्रहालयात, म्हणजे पुन्हा पुण्याच्या स्वाधीन केला आहे. हे संचित जपण्याची जबाबदारी आता पुणेकरांची आहे. siddharth.kelkar@expressindia.com