लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि रंगमंचीय आविष्कार अशा सर्व माध्यमात यशस्वी संचार करणारे प्रसिद्ध संगीतकार आणि गायक राहुल घोरपडे (वय ६६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. राहुल घोरपडे हे ‘सकाळ’चे माजी संपादक बाबासाहेब घोरपडे यांचे नातू आणि ‘केसरी’चे माजी संपादक चंद्रकांत घोरपडे यांचे पुत्र होत. राहुल घोरपडे यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. संगीत, नाट्य,चित्रपट क्षेत्रातील मान्यवर या वेळी उपस्थित होते.
अतिशय सुरेल आवाज आणि भावकवितांचे प्रतिभावान प्रयोगशील संगीतकार म्हणून घोरपडे प्रसिद्ध होते. नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका अशा माध्यमात गायक व निर्माता म्हणून काम करताना घोरपडे यांनी अनेक जाहिराती, अनुबोधपट आणि अनेक नाटकांना संगीतबद्ध केले. ज्येष्ठ गायिका आशा भोसले, सुरेश वाडकर, रवींद्र साठे, अनुराधा मराठे , मुकुंद फणसळकर अशा प्रतिभावंत गायकांनी त्यांच्या संगीतरचनांना आपला आवाज दिला आहे.
आणखी वाचा-‘जीएमआरटी’चे स्थलांतर नाही… पुणे-नाशिक रेल्वेमार्गाची नव्याने आखणी
डॉ. माधवी वैद्य यांच्या ‘अग्निदिव्य’या मराठी चित्रपटाचे संगीतदिग्दर्शन राहुल घोरपडे यांनी केलं होते. ‘बीएमसीसी’च्या ‘सुनिला पारनामे शाळेला चालली होती’, ‘सूतक’ या एकांकिका, साहिर लुधियानवी यांच्या काव्यावर आधारित ‘पडछाया’ हे सुधीर मोघे यांनी रुपांतरित केलेली संगीतिका, ‘जागर’ संस्थेची ‘नंदनवन’, ‘दंभद्वीपचा मुकाबला’, ‘राजा इडिपस’ ही नाटके आणि अनन्वय संस्थेच्या ‘कवी शब्दांचे ईश्वर’ दूरदर्शन मालिकेचे, ‘गाणी बहिणाबाईंची’, सर्व साहित्य संगीत विषयक प्रयोगांचे संगीत त्यांनी दिले होते. ‘स्वर सौरभ’ या स्वतःच्या संस्थेतर्फे ‘बनात जांभुळबनात’, ‘गाणी मंगेशकरांची’, ‘हे स्वप्नांचे पक्षी’ अशा भावगीतांच्या कार्यक्रमाची निर्मिती करून त्यांनी रंगमंचावर शेकडो प्रयोग केले होते. आपल्या चार दशकांच्या संगीत कारकीर्दीत त्यांनी शेकडो रेडिओ आणि दूरचित्रवाणी जाहिराती संगीतबद्ध केल्या होत्या.