‘‘प्रत्येक धर्माचा सामाजिक कायदा वेगळा आहे. शासनाने जसे ‘हिंदू कोड बिल’ बनवले तसा मुस्लीम कायद्याला हात लावला गेला नाही. त्यामुळे विषमता तशीच राहिली. चार लग्नांचा प्रश्न, तोंडी तलाकचा प्रश्न, मूल दत्तक घेण्याचा प्रश्न याबद्दल पावले उचलली गेली नाहीत. तेव्हाच समान नागरी कायदा करण्यात आला असता, तर काही गोंधळ झाले नसते..’’ सय्यदभाई सांगत होते.
साधे कपडे, खांद्याला जुनी शबनम पिशवी आणि ‘खून के आँसू वो बहन-माँ रोती हैं, जिसकी एकतर्फी तलाक होती हैं’ अशा शब्दाशब्दांतून व्यक्त होणारी तळमळ.. मुस्लीम समाजातील पुरोगामी चळवळीत भरीव वाटा असलेल्या आणि अजूनही स्वत:ला कार्यकर्ताच म्हणवून घेणे पसंत करणाऱ्या सय्यदभाईंचे हे वर्णन. सोमवारी सय्यदभाईंनी वयाची ऐंशी वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने त्यांच्या आजपर्यंतच्या वाटचालीबद्दल ‘लोकसत्ता’ने त्यांच्याशी संवाद साधला.
मुस्लीम सत्यशोधक मंडळाची सुरुवात आणि मंडळाच्या भूमिकेबद्दल सय्यदभाई म्हणाले, ‘‘धर्माधता संपली पाहिजे, ऐहिक जीवनातून धर्माला सन्मानपूर्वक बाजूला ठेवले गेले पाहिजे आणि बुद्धिप्रामाण्यवाद वाढला पाहिजे ही आमची भूमिका राहिली. आपल्याकडे स्त्री-पुरुष समानता नाही. मुस्लीम धर्मातील चार लग्नांचा प्रश्न, तोंडी तलाकचा प्रश्न, मूल दत्तक घेण्याचा प्रश्न याबद्दल पावले उललली गेली नाहीत. तेव्हाच समान नागरी कायदा करण्यात आला असता, तर काही गोंधळ टाळता आले असते. या कायद्यासाठी मुस्लीम सत्यशोधक मंडळाने १९७० पासून सातत्याने प्रयत्न केले. त्याआधी दहा वर्षे हमीद दलवाई – ज्यांना मी मुस्लीम समाजातील महात्मा फुले म्हणतो ते देशभर फिरून जमजागृती करत होते. मंडळाला कार्यकर्तेही फुल्यांच्या शहरातून-पुण्यातून मिळाले.’’ देशात आपापले धार्मिक घोडे पुढे कसे दामटता येईल याचाच विचार होतो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
मुस्लीम समाजाची मागासलेपणाची ओळख पुसली न जाण्यास शिक्षणाला महत्त्व न दिले जाणे प्रामुख्याने कारणीभूत आहे, असे सय्यदभाईंनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘पाकिस्तान वेगळा झाल्यावर शिकली सवरलेली बरीचशी माणसे तिथे गेली. जो मुस्लीम समाज इथे राहिला, त्यांना शिक्षणाकडे आणण्यासाठी काम करणाऱ्या संस्था पुरेशा प्रमाणात निर्माण झाल्या नाहीत. देशाची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तान सातत्याने काढत असलेल्या कुरापतींचा परिणाम येथील सामान्य मुसलमानाला भोगावा लागला. मुस्लिमांबद्दल अविश्वास निर्माण होऊ लागला. त्याला मुस्लीम राजकारणीही जबाबदार ठरले. सामान्य मुसलमान इहवादी होऊ नये, त्यांनी अंधळेपणे मते द्यावीत म्हणून मुस्लीम राजकारणी आणि मुल्ला- मौलवींनी त्यांना राजकीय, सामाजिक, व्यावहारिक अशा सर्वच दृष्टींनी गाडून टाकले. त्यामुळे समाज पुढे येऊ शकला नाही. हिंदू-मुस्लीम वाद वाढत गेला. तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसने मुस्लीम मतांशिवाय दुसरे काही पाहिले नाही. शिक्षण, नोकरी, राष्ट्रीय एकात्मता हे आजच्या मुस्लीम तरुणांचे महत्त्वाचे प्रश्न आहेत. आता मुले शिकत आहेत, पण ज्या प्रमाणात ते व्हायला हवे त्या प्रमाणात होत नाही.’’
पुरोगामी चळवळीवर डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड पानसरे यांच्या हत्यांचा आघात झाला असला, तरी पुरोगामित्वाची चळवळ संपून चालणार नाही, चळवळीत नवीन लोक येत आहेत आणि ती पुढे जात राहील, असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला. ‘विचारांचे उत्तर विचारांनीच दिले पाहिजे. जवळचे मुद्दे संपले की माणसे हातघाईवर येतात. धर्माच्या नावाने माणसांना संपवणे जगभर सुरू आहे. पण चळवळींना नवीन कार्यकर्तेही मिळत आहेत,’ असे ते म्हणाले.
—
तलाकपीडित मुस्लीम महिलांच्या प्रश्नांबद्दल सय्यदभाईंनी उर्दूत लिहिलेली कविताही त्यांनी ऐकवली. ही कविता त्यांच्या ‘दगडावरची पेरणी’ या पुस्तकाच्या उर्दू आवृत्तीच्या मलपृष्ठावर छापलेली आहे. या कवितेच्या काही ओळी अशा-
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा