पुण्यातील दांडेकर पूल येथे मुठा कालवा फुटण्याच्या घटनेला आता एका आठवडा होत आला आहे. या घटनेत ४०० हून अधिक घरांचे नुकसान झाले. या पाण्याचा वेग जास्त असल्याने जनता वसाहत येथील अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. पाण्यामध्ये घरातील सर्वच वस्तू वाहून गेल्यामुळे येथील नागरिक बेघर झाले आहेत. याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचा घडलेल्या घटनेत कोणताच दोष नसताना त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचाच विचार करुन अनेक स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तींकडून या नागरिकांना मदतीचा हात देण्यात येत आहे. यामध्ये दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू, आर्थिक मदत, कपडे, भोजन यांची व्यवस्था करण्यात येत आहे. यामध्ये दखल घेण्यासारखी माहिती समोर आली आहे. समाजापासून काहीसे दूर असणारे तृतीयपंथीही बाधितांना मदत करण्यासाठी सरसावले आहेत.

तृतीयपंथींकडून येथील नागरिकांना झुणका-भाकर असे जेवण नुकतेच देण्यात आले. तृतीयपंथीकडून अन्नदान करण्यात आल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी तृतीयपंथी चांदणी गोरे म्हणाल्या, या भागातील नागरिकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी असल्याने सर्वांना झुणका भाकर देण्याचा निर्णय घेतला. आज येथील नागरिकांशी संवाद साधल्यावर याठिकाणी आरोग्याचे प्रश्न निर्माण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आम्ही लवकरच आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.