पुणे : वीजबिलाच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्यानंतर परस्पर वीजपुरवठा घेणाऱ्या थकबाकीदाराने महावितरणच्या जनमित्रास लोखंडी पाइपने मारहाण केली. हवेली तालुक्यातील तुपेवस्ती येथे सोमवारी (दि. १०) ही घटना घडली. या घटनेत जखमी झालेल्या जनमित्राला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर एका आरोपीविरुद्ध ऊरूळी कांचन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अधिनियमाच्या कलम १३२, १२१ (१), ११८ (१), ३५१ (१), ३५१ (३) व ३५२ नुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महावितरणकडून ही माहिती देण्यात आली.
महावितरणच्या उरुळी कांचन उपविभागांतर्गत वरिष्ठ तंत्रज्ञ नीलेश चाकणे व विद्युत सहायक शहाबाज शेख हे तुपेवस्तीमधील साईनगर परिसरात थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करत होते. या वेळी थकबाकीमुळे वीजग्राहक प्रकाश परदेशी यांच्या मालकीच्या घराचा वीजपुरवठा २३ जानेवारीला खंडित करण्यात आला होता. मात्र, त्या ठिकाणी परस्पर वीजपुरवठा घेण्यात आल्याचे तपासणी करताना निदर्शनास आले.
या प्रकरणात कारवाई करताना भाडेकरू कमलेश उत्तम लोंढे याने अंगावर धावून येत ‘खंडित वीजपुरवठा सुरु केला, तर तुम्ही विचारणारे कोण’ असे म्हणत दोन्ही कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. एवढ्यावर न थांबता त्यांना लोखंडी पाइपने मारहाणही केली. या घटनेत चाकणे यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे, असेही महावितरणकडून कळवण्यात आले.