शिक्षा न करता शिकवता येईल का?..आम्ही ज्ञानरचनावाद पुस्तकात वाचला आहे; पण पन्नास- साठ मुलांच्या वर्गात तो राबवणं शक्य आहे का?..शिक्षकालाही विद्यार्थ्यांच्या भूमिकेत जाता येईल का?..पालक म्हणून मुलांशी कसे वागावे?..अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ‘माझी शाळा’ या गोष्टीरूप मालिकेतून समोर येणार आहेत.
ज्ञानरचनावाद सोपा करून सांगणाऱ्या या चाळीस भागांच्या मालिकेची निर्मिती ‘महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड’ने (एमकेसीएल) केली असून प्रसिद्ध दिग्दर्शक सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. २० ऑक्टोबरपासून सह्य़ाद्री वाहिनीवर दर रविवारी सकाळी ९.३० वाजता या मालिकेचे प्रक्षेपण केले जाईल. तर, शनिवारी रात्री ९ वाजता त्याच भागाचे पुन:प्रक्षेपण केले जाईल. भावे, सुकथनकर आणि एमकेसीएलच्या ‘एक्सलन्स अँड टॅलेंट नर्चरन्स प्रोग्रॅम’चे सरव्यवस्थापक उदय पंचपोर आदींनी पत्रकार परिषदेत यामागची भूमिका स्पष्ट केली.
भावे म्हणाल्या, ‘‘आपल्या शिक्षणपद्धतीत मुलांना केवळ माहिती सांगितली जाते. त्यामागची कारणपरंपरा शिकवली जात नाही. विचार करण्याची ही प्रक्रिया लहानपणापासूनच सावकाश सुरू व्हावी लागते. आजचा शिक्षक जुन्याच शिक्षणपद्धतीत शिकलेला असल्यामुळे त्याला वेगळा विचार करण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे. त्याने ज्ञानरचनावाद वाचलेला असतो. तो राबवण्याची त्याची पुष्कळ इच्छा असते. पण हा रचनावाद अमलात आणण्यासाठी आदर्श परिस्थिती आपल्या शाळेत नाही, ही त्याची समस्या असते. या मालिकेत सर्वसाधारण मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये जी परिस्थिती असू शकेल त्याच स्थितीत मुलांना वेगळ्या पद्धतीने विचार करायला लावण्याचा कसा प्रयत्न करता येईल याचे चित्रण आहे.’’
कोणावरही टीका न करता शिक्षणातील नव्या प्रयोगांचे स्वागत करणे आणि शिक्षक व पालकांची मने मोकळी करणे, हाच या मालिकेचा उद्देश असल्याचे सुकथनकर यांनी सांगितले. अभिनेते ओंकार गोवर्धन, कैलास वाघमारे, अश्विनी गिरी, देविका दफ्तरदार आणि डॉ. शेखर कुलकर्णी यांनी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारल्या असून, दिवे, परिंचे आणि डहाणूजवळील ऐना या गावांमध्ये मालिकेच्या सुरूवातीच्या भागांचे चित्रीकरण झाले आहे.
शिक्षकांना या मालिकेचा नंतरही उपयोग व्हावा यासाठी त्याचे भाग www.mkcl.org/majhishaala या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणार असल्याचे पंचपोर यांनी सांगितले. या मालिकेसंदर्भातील आपल्या सूचना प्रेक्षक vichitranirmiti@gmail.com या ई-मेल पत्त्यावर पाठवू शकणार आहेत.
‘एमकेसीएल’तर्फे ज्ञानरचनावाद सोपा करणारी मालिका ‘माझी शाळा’
ज्ञानरचनावाद सोपा करून सांगणाऱ्या ‘माझी शाळा’ या मालिकेची निर्मिती ‘महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड’ने केली असून सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी मालिकेचे दिग्दर्शन केले आहे.
आणखी वाचा
First published on: 19-10-2013 at 02:45 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My school serial by mkcl