माझे काम पत्त्यातील जोकरसारखे आहे, अशी टिप्पणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी चिंचवडला कार्यकर्त्यांसमोर बोलताना केली. काम करून मोठे होण्याची जिद्द सध्याच्या कार्यकर्त्यांमध्ये राहिली नाही. आज पक्षात प्रवेश केला की दुसऱ्या दिवशी पदे मागणारे कार्यकर्ते आढळून येतात, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.
रावसाहेब दानवे रविवारी चिंचवडला होते. पाच तास उशीर होऊनही कार्यक्रमाला असलेली गर्दी पाहून ते खूश झाले. अस्सल ग्रामीण ढंगातील उदाहरणे देत केलेल्या खुमासदार भाषणाने त्यांनी उपस्थितांची मनेजिंकली. दानवे म्हणाले,की नेत्यांची भाषणे ऐकण्याचा फारसा उत्साह लोकांमध्ये नसतो. दोन तासापेक्षा अधिक वेळ राजकीय सभांना लोक थांबत नाहीत; सिनेमासाठी तीन तास थांबू शकतात. तमाशासाठी रात्रभर बसणारे आहेतच. आपण ३०-३५ वर्षांपासून भाजपचे काम करतो आहोत. तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आपण राहतो. मोठय़ा प्रमाणात गर्दी जमवण्याचे कसब एवढय़ा वर्षांत आपल्याला जमले नाही, ते पिंपरी-चिंचवडच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिले. साधारणपणे नेत्यांची बडदास्त ठेवली जाते. कार्यकर्त्यांकडे लक्ष दिले जात नाही, सर्वच राजकीय पक्षात अशी परिस्थिती असते. माझे काम पत्त्यातील जोकरसारखे आहे. ५२ पत्यांचा खेळ मला वेळोवेळी खेळावा लागतो. मीच नेता असतो, मीच कार्यकर्ताही असतो. मीच फटके खातो आणि मीच फटके मारतोही. असे करत-करत इथपर्यंत आलो आहे. कार्यकर्त्यांच्या विश्वासाच्या जोरावरच हा पल्ला गाठू शकलो. कार्यकर्त्यांना ताकद देणारा नेता हवा असतो, असे ते म्हणाले.