स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात यश मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील पुणे नगरपालिकेच्या निवडणुकीतही भाजपला चांगले यश मिळाले आहे. यापैकी पुणे जिल्ह्यातील पवार घराण्याचे वर्चस्व असलेल्या बारामती नगरपालिकेच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बारामतीचा गड राखण्यासाठी अजित पवार यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपने पवार घराण्याच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यासाठी आक्रमक प्रचार केला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने बारामती नगरपालिकेच्या ३९ पैकी ३५ जागांवर विजय मिळवत बारामती म्हणजे पवार हे समीकरण कायम असल्याचे सिद्ध केले. याशिवाय, राष्ट्रवादीने याठिकाणी नगराध्यक्षपद जिंकून पालिकेची सर्व सूत्रे आपल्याच हाती ठेवली आहेत. मुख्यमंत्र्यांनी बारामतीत जाहीर सभा घेऊन राष्ट्रवादीला पाणी पाजण्याची भाषा केली होती. मात्र, बारामतीतील पवारांच्या क्लीन स्वीपमुळे भाजपच्या अपेक्षांवर पुरते पाणी फेरले गेले आहे. अनेक ठिकाणी भाजपने स्थानिक आघाड्यांशी जुळवून घेतले होते. महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी संघटना, आरपीआयसह छोट्या पक्षांनी निवडणूक लढणाऱ्या भाजपला केवळ चार जागांवरच समाधान मानावे लागले. मात्र, दुसऱ्या बाजुला भाजपने पुणे जिल्ह्यातील अनेक पालिकांमध्ये मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या सर्वच नेत्यांनी आक्रमक प्रचार केला होता. भाजप नेते गिरीश बापट यांनी पुणे आणि लातूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक मते मिळाल्याचा दावा केला आहे. याशिवाय, नगराध्यक्षपदांच्या शर्यतीतही भाजप नंबर वनचा पक्ष ठरला आहे.   राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये पुणे आणि लातूर जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींचा समावेश होता. पहिल्या टप्प्यातील विजयाची परंपरा कायम राखण्यासाठी भाजपने सारा जोर लावला होता.  पुण्यातील जेजुरी, बारामती, तळेगाव, लोणावळा, दौंड, सासवड, शिरूर, आळंदी, इंदापूर, जुन्नर या नगरपालिकांसाठी मतदान झाले. पुणे जिल्ह्यातील ३२४ जागांवर १३२६ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. जेजुरीत ८६.१४ टक्के मतदान झाले तर, तळेगाव ६८.२२, दौंड ६०.६१, सासवड ७५.१२, शिरूर ७३.४७, आळंदी ८२.३०, इंदापूर ७७.७२ तर जुन्नरमध्ये ७२.४३ टक्के मतदान झाले. पहिल्या टप्प्यात झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळाले होते. तब्बल ३१ नगरपालिका जिंकून भाजपने आघाडी घेतली आहे. तर ५२ ठिकाणी भाजपचे थेट नगराध्यक्षही निवडून आले आहेत. भाजपपाठोपाठ २० नगरपालिका जिंकत काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. काँग्रेसचेही २२ ठिकाणी थेट नगराध्यक्ष निवडून आले. तर राष्ट्रवादी १७ नगरपालिकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. शिवसेना १६ नगरपालिकांसह शेवटच्या क्रमांकावर आहे. त्रिशंकू अवस्थेतील नगरपालिकांची संख्या तब्बल ३४ आहे.
Live Updates
11:11 (IST) 15 Dec 2016
औसा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अफसर शेख विजयी
11:09 (IST) 15 Dec 2016
औसा नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला २० पैकी १२ जागा
11:08 (IST) 15 Dec 2016
सासवड नगरपरिषदेत काँग्रेसचे २ नगरसेवक विजयी
11:08 (IST) 15 Dec 2016
औसा नगरपालिकेत काँग्रेसला धक्का; राष्ट्रवादीचा उमेदवार आघाडीवर
11:07 (IST) 15 Dec 2016
आळंदीच शिवसेनेचे दोन नगरसेवक विजयी
11:00 (IST) 15 Dec 2016
आळंदी प्रभाग क्र २ मध्ये शिवसेनेचे प्रतिमा गोगावले, तुषार घुंडरे विजयी
11:00 (IST) 15 Dec 2016
तळेगाव वॉर्ड ३ ब भाजपचे संग्राम काकडे विजयी
11:00 (IST) 15 Dec 2016
आळंदी नगरपरिषद प्रभाग १ भाजपचे सागर भोसले विजयी
10:59 (IST) 15 Dec 2016
शिरुर नगरपरिषदेत लोकशाही क्रांती आघाडीचे मंगेश खांडरे विजयी
10:37 (IST) 15 Dec 2016
शिरूरमध्ये शहर विकास आघाडी २० जागांपैकी ७ जागांवर विजयी
10:34 (IST) 15 Dec 2016
तळेगावात जनविकास आघाडीच्या ३ उमेदवारांची बिनविरोध निवड
10:33 (IST) 15 Dec 2016
तळेगाव पालिकेच्या तीन जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड
07:40 (IST) 15 Dec 2016
भाजपला दुसऱ्या टप्प्यातही चांगले यश मिळण्याची आशा; बारामतीसह बहुतेक सर्व शहरांमध्ये मुख्यमंत्र्यांचा जातीने प्रचार
07:40 (IST) 15 Dec 2016
इंदापूरमध्ये काँग्रेस नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला
07:38 (IST) 15 Dec 2016
पहिल्या टप्प्यातील १६४ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची पीछेहाट
07:37 (IST) 15 Dec 2016
पश्चिम महाराष्ट्र या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचा शिरकाव; बारामतीमध्ये फटका बसल्यास तो राष्ट्रवादीकरिता मोठा धक्का असेल
07:37 (IST) 15 Dec 2016
३९ सदस्यीय नगरपालिकेत बहुमत मिळविण्याबरोबरच नगराध्यक्ष निवडून आणण्याचे अजित पवार यांच्यासमोर आव्हान आहे.
07:37 (IST) 15 Dec 2016
बारामती पालिकेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष
07:36 (IST) 15 Dec 2016
सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा