देहूच्या पहिल्याच नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली आहे. एकूण १७ पैकी १४ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले असून दोन जागांवर अपक्षांची लॉटरी लागली आहे. तर, काँग्रेस आणि शिवसेनेला खातं देखील उघडता आलं नाही. भाजपाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. खर तर भाजपाचे माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली होती. त्यात सुनील शेळके विजयी झाले आहेत अस म्हणावं लागेल.
देहू ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यानंतर पहिली निवडणूक पार पडली. यात, मोठ्या फरकाने राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. नगरपंचायत निवडणुकांपासून माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यात चढाओढ पाहायला मिळाली. दोघांनी प्रतिष्ठा पणाला लावत उमेदवार विजयी करण्यासाठी प्रचार केला. मात्र, भेगडे यांच्या पदरी निराशाच पडली आहे. असं म्हणावं लागेल. एकूण १७ जागांसाठी ६० उमेदवार रिंगणात होते. पैकी, १४ राष्ट्रवादी, १ भाजपा आणि २ अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. तर, काँग्रेस आणि शिवसेनेला खातं देखील उघडता आलं नाही. राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होताच मतमोजणी केंद्राबाहेर विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण करत एकच जल्लोष केला.
शिवसेना आणि काँग्रेस या मित्र पक्षांना राष्ट्रवादीने धूळ चारली!
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे मित्र पक्ष एकत्रित असून त्यांची राज्यात सत्ता आहे. परंतु, नगरपंचायतीमध्ये हे पक्ष स्वतंत्र लढले आहेत. याचा थेट फटका काँग्रेस आणि शिवसेनेला बसल्याच देहूत पाहायला मिळालं आहे. असच चित्र महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळतं का हे पाहावे लागेल.