Nagarkar Wada : पुण्यातल्या बुधवार पेठ या ठिकाणी सध्या विस्तारणाऱ्या गल्ल्या दिसतात. मात्र तापकिर गल्ली या ठिकाणी पुण्याची शंभरी पाहिलेला एक वाडा अजूनही उभा आहे. या वाड्याचं नाव आहे नगरकर वाडा ( Nagarkar Wada ). एकेकाळी दिमाखात उभा असलेल्या नगरकर वाड्याला ( Nagarkar Wada ) प्रचंड अवकळा आली आहे.
१०० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला वाडा नामशेष होण्याच्या मार्गावर
नगरकर वाड्यात ( Nagarkar Wada ) मराठेशाहीच्या पद्धतीचं बांधकाम आणि नक्षीकाम आहे. तसंच रघुनाथ दाजी निवास असा फलकही आहे. १८९० मध्ये समाज सुधारक रघुनाथ नगरकर यांनी हा वाडा बांधला होता. रघुनाथ नगरकर यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र हरि नगरकर यांनी या वाड्याची ( Nagarkar Wada ) देखभाल केली. हरि नगरकर यांच्यानंतर हा नगरकर वाडा ( Nagarkar Wada ) वारसा म्हणून घोषित करण्यात आला. हा वाडा ४ हजार स्क्वेअर फूटमध्ये विस्तारलेला आहे. तसंच या वाड्याच्या खांबांवर उत्तम नक्षीकाम आहे. व्हिक्टोरियन शैलीचे दरवाजे या वाड्याला आहेत. तसंच उत्तम स्थापत्य कलेचा हा नमुना होता. तसंच भारतीय संस्कृती सांगणारे दरवाजे या वाड्याला होते. वाड्याच्या छतावरही उत्तम नक्षीकाम केलेलं होतं. आता मात्र या वाड्याची दुरवस्था झाली आहे.
हे पण वाचा- मानाचा पाचवा केसरी वाडा गणपतीचा इतिहास
उत्तम वास्तुकलेचा उत्तम नमुना
वाड्याच्या ( Nagarkar Wada ) खिडक्यांची रचनाही विशिष्ट इंग्लिश पद्धतीची होती. तसंच त्या खिडक्यांच्या तावदानांवर सिंह, वाघ, चित्ते, अस्वल यांची चित्रं कोरलेली होती. यक्षाचं चित्रही काही दरवाजांवर कोरलेलं होतं. मात्र याच वाड्याला आता प्रचंड रया आली आहे. या वाड्यात दोन मोठी अंगणं होती. तर ३२ बाय १६ स्क्वेअर फूटचा दिवाणखाना होता.
दिग्गजांचे पाय लागलेला ऐतिहासिक वाडा
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, सोनोपंत दांडेकर या दिग्गजांचे पाय या वाड्याला लागले आहेत. भारतीय पुरातत्व खात्याने या वाड्याला क्रमांक १ श्रेणीचा वारसा असा दर्जा दिला होता. मात्र आता सध्या या वाड्याच्या बाहेर असलेला फलक पुढे धोका आहे हा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो आहे.
वाड्यातले जुने रहिवासी चंद्रशेखर कुलकर्णी काय म्हणाले?
इंडियन एक्स्प्रेसशी चर्चा करताना या वाड्यातले सर्वात जुने रहिवासी चंद्रशेखर कुलकर्णी म्हणाले “मी मागच्या ७० वर्षांपासून या ठिकाणी राहतो आहे. माझ्या कुटुंबाच्या चौथ्या पिढीचा मी आहे. लहानपणापासून हा वाडा पाहतोय. मात्र या वाड्याचा वरचा भाग आता वापरायोग्य नाही. तसंच छतामधून पाणी गळतं. त्यामुळे या वाड्याची प्रचंड दुरवस्था मागच्या काही वर्षांमध्ये झाली आहे. या वाड्याला आता पूर्वीचं वैभव उरलेलं नाही. खरंतर या वाड्याला पुरातत्व खात्याने क्रमांक १ चा वारसा असा दर्जा दिला होता. मात्र पुणे महापालिकेने वाडा जतन करण्यासाठी काहीही विशेष पावलं उचलली नाहीत.” अशी खंत कुलकर्णी यांनी बोलून दाखवली.
वाड्याला वारसा वास्तूचा दर्जा पण उपेक्षा कायम-कुलकर्णी
वाड्याच्या आतला बराचला भागही कोलमडून पडला आहे. तसंच हा वाडा आता धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळेच वाड्याच्या समोरच्या बाजूला मराठी सावधान! पुढे धोका आहे असे फलक लावण्यात आले आहेत. एक काळ असाही होता की वाड्यात १७ ते १८ कुटुंबं राहात होती. प्रत्येक सणवार बरोबर साजरा करायची. आता फक्त दोन कुटुंबं भाडेकरु म्हणून उरले आहेत. अशीही आठवण कुलकर्णी यांनी सांगितली. पावसाळ्यात तर इथे राहणं मुश्किल होऊन जातं. वाड्याची मागची बाजू म्हणजे तर ढिगाऱ्यासारखी झाली आहे. अनेक पर्यटक वाडा पाहण्यासाठी येतात. तेव्हा ते या वाड्याची कशी दुरवस्था झाली आहे त्याचे फोटो काढतात. माझी अजूनही इच्छा आहे की हा वाडा जतन केला जावा. अशा पद्धतीने वाड्याचे भाग कोसळताना पाहून आणि पुढे धोका आहे हे फलक पाहून माझ्या मनाला असह्य वेदना होतात. एक काळ होता की हा वाडा दिमाखात उभा होता. या वाड्याला गतवैभव प्राप्त झालं तर त्याचा इतिहास भविष्यातल्या पिढ्यांना सांगता येईल. हा वाडा म्हणजे उत्तर स्थापत्य कलेचा नमुना होता, ते दिवस या वाड्याला पुन्हा आले पाहिजेत असं वाटतं असं कुलकर्णी यांनी सांगितलं.