रामकृष्ण मोरे यांच्याबरोबरीने काम सुरू केले. बऱ्यापैकी काम केल्यानंतर आणि काँग्रेसचे विभाजन झाल्यानंतर विधानसभेची उमेदवारी मिळाली. मात्र, प्रतिस्पर्धी उमेदवाराने दिल्लीतील संबंध वापरून आपले तिकीट कापले. तो आपल्याला मिळालेला मोठा ‘धडा’ होता. तेव्हापासून अभ्यास आणि लेखनाकडे पूर्णपणे वळलो, असा स्व:अनुभव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी चिंचवड येथे सांगितला.
पिंपरीतील भिकू वाघेरे प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. मोरे यांना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार देण्यात आला, तेव्हा ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, महापौर शकुंतला धराडे, डॉ. मोरे यांच्या पत्नी सुरेखा मोरे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समितीचे अध्यक्ष अतुल शितोळे, पक्षनेत्या मंगला कदम, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजोग वाघेरे, ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत गावडे, उषा वाघेरे आदी उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, मी आणि रामकृष्णने एकाच वेळी सामाजिक क्षेत्रात काम सुरू केले. १९७८ मध्ये काँग्रेसचे विभाजन झाले, भिकू वाघेरे व मी इंदिरा काँग्रेसमध्ये गेलो. तत्कालीन विधानसभेच्या निवडणुकीत मी, वाघेरे आणि मोतीराम पवार अशी तिकिटासाठी स्पर्धा होती. तिकीट आपल्याला जाहीर झाले. मात्र, पवार यांनी संजय गांधी यांच्या माध्यमातून आपले तिकीट कापले आणि स्वत: उमेदवारी मिळवली. तो आपल्याला मिळालेला मोठा धडा होता. आता राजकारण पुरे, असा निर्णय तेव्हाच घेतला. त्यामुळे १९८० पासून पूर्ण वेळ अभ्यासाला आणि लेखनाला वाहून घेतले. मित्र असलेल्या वाघेरे यांच्या नावाचा पुरस्कार मिळतो आणि देहूकर असूनही पिंपरी-चिंचवडकर आपला मानतात, हा आनंददायी क्षण आहे. डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, समाजातील चांगले-वाइटाचे भान करून देणारे मोरे हे मोठे लेखक आहेत. त्यांनी महाराष्ट्राला मार्गदर्शन होईल, असे लेखन करावे.
प्रास्तविक संजोग वाघेरे यांनी केले. सूत्रसंचालन नाना शिवले यांनी केले. प्रभाकर वाघेरे यांनी आभार मानले.
साहित्य, संस्कृती मंडळ अध्यक्षपदी सदानंद मोरे?
रिक्त असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे यांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी आपण व हेमंत टकले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. डॉ. मोरे या पदाची उंची वाढवतील, या शब्दात मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी या वेळी दिली.