पिंपरी पालिकेचा ‘सारथी’ उपक्रम लोकाभिमुख आहे, त्याची उपयुक्तता लक्षात घेता ‘सारथी’चा नागपूर शहरातही अवलंब करण्यास उत्सुक असल्याचे नागपूर पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पिंपरीत सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकाभिमुख प्रशासनासाठी आग्रही आहेत, असेही ते म्हणाले.
पिंपरी पालिकेच्या ‘सारथी’ उपक्रमास राज्यशासनाचे दहा लाखाचे बक्षीस मिळाल्यानंतर हर्डीकरांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ‘सारथी’ तसेच पिंपरी पालिकेतील विकासकामांची माहिती घेतली. घरकुल प्रकल्पाला भेटही दिली. अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. नागपूर पालिकेचे उपआयुक्त जयंत दांडेगावकर, सहायक आयुक्त महेश धामचा, संगणक विभागप्रमुख प्रवीण देशमुख यांचा शिष्टमंडळात समावेश होता. पिंपरीचे सहआयुक्त दिलीप गावडे, राजन पाटील, क्रीडा सभापती जितेंद्र ननावरे, संगणक अधिकारी नीलकंठ पोमण, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
या वेळी पत्रकारांशी बोलताना हर्डीकर म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमध्ये वेगाने विकास होतो आहे. चांगल्या प्रकारच्या अधिकाधिक सुविधा आपल्याकडे सुरू कराव्यात, यासाठी आम्ही आग्रही आहोत. ‘सारथी’ प्रकल्प पथदर्शी असून त्याचा वापर नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी होऊ शकतो, त्याचा अवलंब करण्यास आम्ही उत्सुक आहोत. सुधीर बोऱ्हाडे यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले.

Story img Loader