गोड रसाळ नागपूर संत्र्यांचा हंगाम सुरू झाला आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात संत्र्यांची आवक सुरू झाली असून हंगामाच्या पहिल्या टप्यात नागपूर संत्र्यांची आवक कमी प्रमाणावर होत आहे.नागपूर, अमरावती भागात संत्र्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. नागपूर भागातील संत्री गोड असतात. नागपूरसह नगर जिल्ह्यात संत्र्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र, नगर जिल्ह्यातील संत्री आंबट गोड असतात. नागपूर संत्री गोड आणि रसाळ असतात तसेच रंगाने पिवळी असतात. नगर जिल्ह्यातील संत्र्यांचा रंग तुलनेने कमी पिवळसर असतो. चवीला गोड आणि रसाळ असणाऱ्या नागपूर संत्र्यांला मागणी चांगली असते. नागपूर, अमरावती परिसरातील संत्री पेट्यांमधून विक्रीस पाठविण्यात येतात, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील संत्री व्यापारी ज्ञानोबा बिरादार यांनी सांगितले.
हेही वाचा >>>पुणे: ललित कला केंद्राची शनिवारी ‘ललित पौर्णिमा’; त्रिपुरारीनिमित्त रात्रभर कला सादरीकरण
नागपूर संत्र्यांचा हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरू होतो. जानेवारी महिन्यापर्यंत हंगाम सुरू होतो. यंदा पावसाच्या तडाख्यामुळे नागपूर संत्र्यांच्या लागवडीवर परिणाम झाला असून हंगामाच्या पहिल्या टप्प्यात संत्र्यांची कमी प्रमाणावर होत आहे. डिसेंबर महिन्यात हंगाम बहरात येतो. त्या वेळी संत्र्यांची आवक मोठ्या प्रमाणावर होते आणि दरही कमी होतात. हंगामाच्या पहिल्या टप्यात नागपूर संत्र्यांचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढले आहेत. किरकोळ ग्राहक तसेच ज्युस विक्रेत्यांकडून संत्र्यांना मागणी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.घाऊक बाजारात ८ ते १० डझनाच्या नागपूर संत्र्याच्या पेटीचे दर एक हजार ते १२०० रुपये आहेत. ११ ते १२ डझनाच्या पेटीतील संत्री आकाराने लहान असतात. ११ ते १२ डझनाच्या पेटीचे दर प्रतवारीनुसार ८०० ते १२०० रुपये आहेत. किरकोळ बाजारात एक किलो संत्र्यांचे दर १०० ते १२० रुपये दरम्यान आहेत.
हेही वाचा >>>पिंपरी: महापालिका निवडणुकांबाबत संभ्रमावस्था ; इच्छुक उमेदवार अस्वस्थ
मार्केट यार्डातील फळबाजारात नागपूर, अमरावती परिसरातून दररोज एक ते दोन गाड्यांमधून संत्र्यांची आवक होत आहे. एका गाडीत चारशे पेट्या असतात. यंदा परतीच्या पावसामुळे संत्र्यांंचे नुकसान झाले असून हंगामाच्या पहिल्या टप्प्यात दर तेजीत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत पेटीमागे १०० ते २०० रुपयांनी दर वाढले आहेत.- ज्ञानोबा बिरादार, संत्री व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड