जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये ‘नमामि चंद्रभागा’ अभियान राबविण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी प्रशासनाला दिला आहे. या अभियानासाठी जिल्ह्यातील नदीकाठच्या किमान दहा हजार लोकसंख्या असलेल्या ३३ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांत सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
हेही वाचा >>>पुणे: पीएमआरडीएच्या भूखंडांच्या ई-लिलाव प्रक्रियेला स्थगिती नाही; मुख्यमंत्री शिंदे यांची स्पष्टोक्ती
निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये भीमा, भामा, इंद्रायणी, पवना, मुळा, मांडवी, कुकडी, वेळ, मुळा-मुठा आदी नद्यांच्या काठावरील गावांचा समावेश करण्यात आला आहे. नमामि चंद्रभागा या अभियानासाठी दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी आणि शिरूर या आठ तालुक्यांतील गावांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने या अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी ५० टक्के निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचाही वापर करता येणार आहे. शिवाय या अभियानासाठीचे गाव आणि अभियाननिहाय प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून, या प्रकल्प अहवालांना तांत्रिक मान्यता घेण्याचा आदेश या तालुक्याच्या सर्व गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
दरम्यान, गावाची लोकसंख्या किमान दहा हजार अनिवार्य, गाव नदीकाठावर असावे, प्रकल्पासाठी नदीकाठावर पुरेशी जमीन उपलब्ध असावी, उपलब्ध जमीन ही पूरक्षेत्राच्या बाहेर असणे बंधनकारक हे गाव निवडीचे निकष आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा >>>राज ठाकरे ‘नवं काहीतरी’ या विषयावर पुण्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष
अभियानात या गावांची निवड
या अभियानासाठी शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा, मांडवगण फराटा, शिक्रापूर, सणसवाडी आणि तळेगाव ढमढेरे, दौंड तालुक्यातील राहू, पाटस, कुरकुंभ, यवत, केडगाव आणि वरवंड, इंदापूर तालुक्यातील वरवंड, पळसदेव, हवेली तालुक्यातील पेरणे, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, उरुळीकांचन आणि कुंजीरवाडी, जुन्नर तालुक्यातील नारायणगाव, वारूळवाडी आणि ओतूर, खेड तालुक्यातील नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, खराबवाडी आणि कडुस, मुळशी तालुक्यातील खडकाळे, इंदोरी, सोमाटणे, वराळे (ता. मावळ) आणि पिरंगुट, हिंजवडी, माण आणि भूगाव या गावांची निवड करण्यात आली आहे.