नामदेव ढसाळ यांच्या मनामध्ये एक वेदना होती. लोकांचे जीवन त्यांनी जवळून पाहिले होते. त्यातूनच त्यांचे साहित्य निर्माण झाले. दलित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी संघर्ष उभारला. त्यांचे हे काम जोमाने पुढे नेणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आली.
दलित पँथरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सभेत वनमंत्री पतंगराव कदम, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले, महापौर चंचला कोद्रे, भाजपचे आमदार गिरीश बापट, दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचे (डिक्की) संस्थापक मिलिंद कांबळे तसेच भगवान वैराट, दिलीप जगताप, रवी गरुड, लतिका साठे आदींनी या वेळी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. दलित पँथरचे प्रदेश कार्याध्यक्ष व कार्यक्रमाचे संयोजक यशवंत नडगम तसेच एम.डी. शेवाळे, परशुराम वाडेकर त्या वेळी उपस्थित होते.
कदम म्हणाले की, कार्यकर्ते कसे सांभाळायचे व त्यांच्यावर प्रेम कसे करायचे, हे ढसाळांनी शिकविले. त्यांच्या साहित्यात आत्मा  होता. कारण ते एसीमध्ये बसून लिहिलेले नव्हे, तर प्रत्यक्ष भोगण्यातून आलेले साहित्य होते. लोकांचे जीवन त्यांनी जवळून पाहिले होते.
आठवले म्हणाले की, मित्र, कवी, नेता, कार्यकर्ता नामदेव ढसाळांसारखा असावा. माणसांसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांच्या जाण्यामुळे आम्ही पोरके झालो. ढसाळ यांनी चालविलेले काम पुढे गेले पाहिजे. त्यासाठी सर्वानी एकत्र येण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यांचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण झाले पाहिजे.
बापट म्हणाले की, सामाजिक काम करताना ढसाळांनी जात-धर्माचा विचार केला नाही. ते साहित्यिक, राजकारणी व पँथर होते. त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना जन्म व विचारसरणी दिली. कवितेच्या रूपाने ते सर्वसामान्यांत पोहोचले. त्यांच्या मनात एक वेदना होती, ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा