पीएमपीचा पास परत देताना विद्यार्थिनींना पाया पडायला लावणाऱ्या वाहकाला तातडीने निलंबित करण्यात आले आहे. या प्रकाराची पीएमपी प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून सर्व आगार व्यवस्थापकांची बैठक घेऊन त्यांना आपापल्या आगारातील चालक व वाहकांना योग्य त्या सूचना देण्याचे आदेश सोमवारी देण्यात आले.
सहावी व सातवीतील मिळून सात विद्यार्थिनी पूलगेट येथून चुकून कोथरूडला जाणाऱ्या पीएमपीच्या गाडीत शनिवारी बसल्या. वाहकाने त्यांच्याकडे तिकिटाचे पैसे मागितल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडील पीएमपीचा पास दाखवला. मात्र तो पास त्या मार्गावर चालणारा नसल्यामुळे वाहकाने विद्यार्थिनींना तिकीट घ्यायला सांगितले. दोन विद्यार्थिनींनी तिकीट घेतले. मात्र इतर विद्यार्थिनींकडे पैसे नसल्यामुळे त्यांना तिकीट घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे विद्यार्थिनींनी आम्हाला खाली उतरवा अशी विनंती वाहकाला केली. मात्र वाहकाने त्यांना दमदाटी करत काहीजणींना नेहरू मेमोरिअल हॉलजवळ तर काहींना स्वारगेट येथे खाली उतरवले. शिवाय खाली उतरवण्यापूर्वी या वाहकाने विद्यार्थिनींना त्याच्या पाया पडायला लावले. या प्रकाराबाबत विद्यार्थिनींच्या पालकांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती.
या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित आगार व्यवस्थापकांनी सोमवारी दहा ते पंधरा सेवकांकडे चौकशी केली. त्यानंतर बदली वाहक नामदेव बन्सी दराडे याने हा प्रकार केल्याचे लक्षात आले. चौकशीनंतर या वाहकाला तातडीने निलंबित करण्यात आले.
पीएमपीच्या कोणत्याही चालकाने वा वाहकाने प्रवाशांशी गैरवर्तन केल्यास शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात येईल अशी ताकीदही देण्यात आली आहे. पीएमपीमध्ये महिलांना तसेच शालेय विद्यार्थिनींना प्राधान्याने प्रवेश द्यावा, त्यांच्या सुरक्षिततेबद्दल काळजी घ्यावी, त्यांना पीएमपी प्रवासात काही अडचण असेल वा त्यांची काही तक्रार असेल तर त्यांना योग्य ती मदत करावी अशाही सूचना चालक आणि वाहकांना देण्यात आल्या आहेत.
पीएमपी चालक वा वाहकांमुळे संस्थेची प्रतिमा खराब होईल असे वर्तन कोणाच्या हातून घडल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येईल, असेही कळवण्यात आले असून त्याबाबत सर्व कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. या संबंधी सर्व आगार व्यवस्थापकांनी आपापल्या आगारातील चालक, वाहकांची बैठक घेऊन त्यांना सूचना द्याव्यात असेही सांगण्यात आले आहे.

Story img Loader