पिंपरी: चिंचवडशहरासह लगतच्या भागाला शिवनेरी जिल्हा म्हणून नाव द्यावं अशी मागणी भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ते पिंपरी- चिंचवड शहरातील आकुर्डी येथे बोलत होते. विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पिंपरी- चिंचवड दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज आमदार महेश लांडगे यांनी पुणे जिल्ह्याचे विभाजन करून पिंपरी- चिंचवडच्या बाजूच्या भागाला जिल्हा म्हणून शिवनेरी नाव द्यावं अशी मागणी केली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अण्णा बनसोडे, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, महानगर पालिका आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पिंपरी- चिंचवड दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटने झाली. अकुर्डीत असलेल्या ग.दि.मा या नाट्यगृहाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ते आजपासून रसिक प्रेक्षकांसाठी खुले झाले आहे. आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाषण केले. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे शहराला पोलिस आयुक्तालय मिळाले तशीच आणखी एक मागणी असल्याचे सांगत पुणे जिल्ह्याचं विभाजन करत पिंपरी- चिंचवड शहराच्या बाजूच्या परिसराला (भागाला) शिवनेरी जिल्हा म्हणून नाव द्यावं अशी मागणी केली. राजकीय विभाजन नाही केवळ जिल्ह्याचे विभाजन म्हटलं आहे. उगाच वेगळ्या बातम्या चालवू नका असंही लांडगे म्हणाले.