पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात राबविलेल्या मतदार यादी अद्ययावतीकरण मोहिमेंतर्गत दुबार, मयत अशा सुमारे दोन लाख ८१ हजार ५८९ मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली आहेत. जिल्हा निवडणूक शाखेकडून नुकतीच जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील आठ विधानसभा मतदार संघांपैकी कोथरूडमधील सर्वाधिक ४९ हजार मतदार वगळण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवडमधील तीन मतदार संघांपैकी पिंपरीत सर्वाधिक १३ हजार, तर ग्रामीण भागातील दहा मतदार संघांपैकी खेडमध्ये सर्वाधिक १५ हजार मतदार वगळण्यात आले आहेत.
हेही वाचा- पुणे: संलग्न महाविद्यालयांकडून विद्यापीठाची फसवणूक?
जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघांतील मतदारांची संख्या ७८ लाख ७६ हजार ९५० इतकी झाली आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रारूप मतदार यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात येते. या मतदार यादीवर हरकती, सूचना मागविल्या जातात. त्यावर सुनावणी घेऊन ५ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाते. या कार्यक्रमानुसार सध्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादीत नाव नोंदणी, नाव, पत्त्यांमधील दुरुस्ती, एका मतदार संघातून दुसऱ्या मतदार संघात नाव नोंदविणे, मतदार यादीतील दुबार आणि मयत नावे वगळणे आदी कामे हाती घेतली जातात.
कोथरूडमधील ४९ हजार मतदार कमी
शहरातील वडगावशेरी मतदार संघातून ४४ हजार २१३ मतदार वगळण्यात आले आहेत. शिवाजीनगरमधून १६ हजार ९८५, कोथरूडमधून ४९ हजार ४९८, खडकवासलामधून ३४ हजार ५१, पर्वतीमधून २८ हजार २८६, हडपसरमधून ३० हजार ७३६, पुणे कॅन्टोन्मेंटमधून २२ हजार ४४०, तर कसबा पेठमधून ११ हजार ६८० मतदार वगळण्यात आले आहेत.
मतदार यादीत नाव कसे तपासाल?
मतदार यादीत नाव आहे किंवा कसे, हे http://www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा voters helpline या मोबाइल उपयोजनवर (ॲप) संपूर्ण नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ ही माहिती भरल्यानंतर समजेल. मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज क्रमांक सहा भरावा, पत्ता बदलण्यासाठी आठ-अ, तर नाव वगळणीसाठी सात क्रमांकाचा अर्ज भरावा, असे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.
हेही वाचा- पुणे : विनाअनुदानित शाळेतून अनुदानित शाळेत बदली स्थगितीच्या निर्णयाला विरोध
शहरातील आठ विधानसभा मतदार संघांतील पूर्वीचे आणि आताचे मतदार
मतदारसंघ पूर्वीचे मतदार आताचे मतदार
वडगाव शेरी ४,७१,०१० ४,२६,७९७
शिवाजीनगर २,९०,९१९ २,७३,९३४
कोथरूड ४,३४,५७५ ३,८५,०७७
खडकवासला ५,४०,५७२ ५,०६,५२१
पर्वती ३,५६,२१२ ३,२७,९२६
हडपसर ५,५५,९१० ५,२५,१७४
पुणे कँटोन्मेंट २,८७,५३५ २,६५,०९५
कसबा पेठ २,८६,०५७ २,७४,३७७