पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी बचाव पक्षाकडून मंगळवारी दोन साक्षीदारांची नावे सादर करण्यात आली. न्यायालयाने दोन साक्षीदारांना हजर राहण्याबाबत समन्स बजाविले आहे.
डाॅ. दाभोलकर हत्येप्रकरणी डाॅ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ॲड. संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले आहेत. डाॅ. दाभोलकर हत्येप्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) पुरावे सादर केले होते. सीबीआयने सादर केलेले पुरावे खोटे असल्याचे आरोपींनी यापूर्वी झालेल्या सुनावणीत न्यायालयात सांगितले होते. त्यावेळी कळसकर आणि ॲड. पुनाळेकर यांनी त्यांचे लेखी म्हणणे न्यायालयात सादर केले होते. डाॅ. तावडे याने सीबीआय अधिकाऱ्यांना साक्ष देण्यासाठी बोलाविण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यावेळी न्यायालयाने पुढील सुनावणीच्या वेळी साक्षीदारांची यादी सादर करण्याचा आदेश बचाव पक्षाला दिला होता. मंगळवारी झालेल्या सुनावणीत बचाव पक्षाने दोन साक्षीदारांचे नावे न्यायालयात सादर केली. याप्रकरणात पुढील सुनावणी ५ जानेवारी रोजी होणार आहे.
डाॅ. दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयने आतापर्यंत २० साक्षीदार सादर केले आहे. त्यांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाली आहे. गेल्या सुनावणी दरम्यान न्यायालायने आरोपींना ३०० पेक्षा जास्त प्रश्न विचारले होते. त्यावेळी आरोपींनी बहुतांश प्रश्नांना ‘माहीत नाही’, असे उत्तर दिले होते.