नाना काटे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी घेतली भेट

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मतदारांनी आपल्याला चांगला कौल दिला आहे. आपल्यासाठी संधी असतानाही त्याचे विजयात रुपांतर झाले नसले तरी खचून न जाता या निवडणुकीत झालेल्या चुकांमध्ये सुधारणा करून पुढील निवडणुकीच्या तयारीला लागा. अशा सूचना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाना काटे यांच्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना दिल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘इतके मोठे तुम्ही नक्कीच नाही’…, हेमंत रासने यांची आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर टीका, समाजमाध्यमातून वाक़युद्ध

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादीचे प्रदेश समन्वयक सुहास उभे, राष्ट्रवादी विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, माजी नगरसेवक प्रभाकर वाघेरे, माजी आमदार उल्हास पवार यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेऊन निवडणुकीसंदर्भात चर्चा केली.

यावेळी शरद पवार यांनी चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत प्रभाग निहाय माहिती घेतली. कोणत्या प्रभागात किती मते पडली, कोणी-कोणी काम केले, आपल्यासाठी परिस्थिती सकारात्मक असतानाही आपण कुठे कमी पडलो यासह निवडणुकीतील प्रत्येक बारकाव्यांबाबत माहिती घेतली. यावेळी नाना काटे यांच्यासह उपस्थित प्रमुख मान्यवरांनी संपूर्ण माहिती दिली. भाजपच्या नेत्यांनी शेवटच्या टप्प्यात प्रशासकीय यंत्रणेचा केलेला गैरवापर, पैशांचा वापर, कार्यकर्त्यांना पोलिसांनी दिलेला त्रास यासह सर्व माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा >>> कसब्यात धंगेकरांच्या विजयाचा नेमका अर्थ काय? प्रकाश आंबेडकरांनी केलं महत्त्वाचं विधान; म्हणाले, “या निकालातून…”

सर्व बाबींची माहिती घेतल्यानंतर शरद पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, महाविकास आघाडीसाठी सध्या अत्यंत सकारात्मक स्थिती आहे. येणार्‍या प्रत्येक निवडणुकीत आपण योग्य पद्धतीने नियोजन करून काम केल्यास विजय आपलाच असणार आहे. लोकांनाही आता बदल हवा असल्याने आपल्याला अत्यंत जबाबदारीने काम करावे लागणार आहे. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये झालेल्या चुकांमध्ये दुरुस्ती करून येणार्‍या महापालिका निवडणुकींच्या तयारीला आतापासून लागा. येत्या काही दिवसांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत एक आढावा बैठक घेऊयात, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana kate with ncp office bearers meet sharad pawar in pune zws 70 kjp