‘देश आणि समाजासाठी काही तरी करा. देवपूजेपेक्षा आपल्या हातून घडणारे सत्कार्य हीच खरी देवपूजा आहे. देशाचे काय होणार,अशी चिंता व्यक्त केली जात आहे. देशाचे भवितव्य हे लहानग्याच्या हाती सुरक्षित राहिल,’असा विश्वास प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी शनिवारी व्यक्त केला.
पुणे पोलिसांच्या शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात रस्ता सुरक्षा अभियानाची शनिवारी सांगता झाली. त्या वेळी विद्यार्थ्यांचे संचलन झाले. या प्रसंगी नाना पाटेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पोलीस आयुक्त के.के. पाठक, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड या वेळी उपस्थित होते.
नाना पाटेकर म्हणाले, ‘‘सध्या देशात निराशेचा सूर आळवला जात आहे. पण विद्यार्थ्यांकडे पाहिल्यानंतर त्यांच्या हाती देश सुरक्षित राहिल, असा विश्वास वाटतो. आपण देश आणि समाजाचे देणे लागतो,याचेही भान ठेवणे गरजेचे आहे. शेजाऱ्यांवर प्रेम करायला शिका. दररोज देवपूजा करण्यापेक्षा आपल्या हातून सत्कार्य कसे घडेल याची जाणीव ठेवा. शेवटी सत्कार्य हीच खरी देवपूजा आहे.’’
‘पालकांनी मुलांना कोंडून न ठेवता त्यांना मोकळे सोडावे.जेव्हा मुले पडतील तेव्हा ती खऱ्या अर्थाने घडतील. त्यामुळे त्यांना पडून घडू द्या,’असा सल्लाही पाटेकर यांनी दिला.
आयुष्यात अनेक पुरस्कार मिळाले आणि प्रसिद्धीदेखील मिळाली. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून जे कार्य सुरु केले आहे, त्याचे समाधान वेगळेच आहे.आपल्या कामामुळे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलते याचा आनंद मोठा आहे. तो शब्दांत मांडता येत नाही, असे त्यांनी सांगितले.

संपूर्ण पोलीस दलाला दोष देऊ नका
एखाद्या पोलिसाने चुकीचे काम केले तर समाजाने संपूर्ण पोलिस दलाला दोषी ठरवू नये.पोलिसांचा त्याग समाजाच्या लक्षात येत नाही. पोलिस हे समाजाचे सेवक आहेत, असे नाना पाटेकर यांनी नमूद केले.

Story img Loader