‘‘गेली चाळीस वर्षे माझा आमटे कुटुंबाशी संबंध आहे. ही मंडळी नकळत आत झिरपत गेली आहेत. बाबा आमटेंनी मला मुलासारखेच वागवले. त्यांच्या तीन मुलांमधला मीच वांड! मी आज जमिनीवर राहिलो आहे याचे कारण हेच लोक आहेत. यांनी माझे कासरे ओढून धरले आहेत; नाहीतर मी सांडासारखा उधळलो असतो!’’ अभिनेते नाना पाटेकर सांगत होते. समृद्धी पोरे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे- द रिअल हीरो’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी नाना शनिवारी पुण्यात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी गप्पा मारल्या.
 या चित्रपटात नाना यांनी डॉ. प्रकाश आमटे यांची तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी डॉ. मंदाकिनी आमटे यांची भूमिका साकारली आहे. नाना म्हणाले, ‘‘ ‘बायोपिक’ प्रकारातले चित्रपट सहसा रटाळ होतात. पण प्रकाश आणि मंदाचे आयुष्य रोजच्या रहाटगाडग्याच्या जगण्यापलीकडचे आहे. हा चित्रपट केवळ प्रकाशचा जीवनपट नव्हे; ही प्रेमकथाही आहे. बाबा आमटेंनी मला मुलासारखेच वागवले. आम्हा तीन भावंडांमधला मीच वांड. ‘तुझा पिंड कलाकाराचा आहे, तू आश्रमात राहून मरशील,’ असे बाबा म्हणत. आज मी जमिनीवर आहे असे मी मानतो, त्याला हीच मंडळी कारणीभूत आहेत. त्यांनी माझे कासरे ओढून धरले नसते, तर मी चौखुर उधळलो असतो! या चित्रपटात मला प्रकाशची नक्कल न करता त्याचे काम पोहोचवायचे होते. पाहणाऱ्याला ते क्लिष्ट वाटायला नको हे आव्हान होते.’’
या चित्रपटाचे चित्रीकरण ६० ते ६५ दिवसांत हेमलकसा येथेच झाल्याचे नाना यांनी सांगितले. प्रकाश आमटे यांनी लिहिलेले ‘प्रकाशवाटा’ आणि विलास मनोहर यांचे ‘नेगल’ या पुस्तकांमधील काही भागावर हा चित्रपट आधारित असल्याचेही ते म्हणाले.
नटाला फक्त ‘असणं’ कळायला हवं!
अभिनयाबद्दल बोलताना नाना म्हणाले, ‘‘आपल्या नटांचा एक प्रॉब्लेम आहे. ते सतत अभिनय करतात! काही जण कॅमेरा सुरू असताना आणि काही तो सुरू नसतानाही अभिनय करत राहतात. नटाला फक्त ‘असणं’ कळावं लागतं. हे ‘असणं’ असलं की मग ‘मी’ कोण आहे, कसा दिसतो या गोष्टी उरत नाहीत. नट किराणा मालाच्या दुकानासारखा असतो! गूळ मागितला की गूळ, शेंगदाणे मागितले की शेंगदाणे त्याने द्यायचे असतात. पण मला कुणी गूळ मागितला की मी ‘साखर चालेल का,’ असे विचारतो! या चित्रपटातही मी असा हस्तक्षेप केला आहे.’’
जवळपास सर्वच पक्षांनी प्रचाराला बोलावले!
‘जवळपास सर्वच पक्षांनी मला निवडणुकीच्या प्रचारासाठी बोलावले आहे, पण मी कुणाचाही प्रचार करणार नाही,’ असे नाना यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘आज याच्या, उद्या त्याच्या प्रचाराला जाणे हे मला पटत नाही. पैशांशिवाय मला माझी मते आहेत की नाही? मी जोपर्यंत कुणाचा मिंधा नाही, तोपर्यंतच मला राजकारणाच्या सद्य:स्थितीवर बोलण्याचा अधिकार आहे. कलावंताने किंवा सामाजिक कार्यकर्त्यांने निवडणुकीला उभे राहू नये. राजकारणात नुसतेच प्रामाणिक असून चालत नाही. कामे करून घेण्याची ताकदही लागते. हा माझा पिंड नव्हे. मी फक्त बोलू शकतो.’’

Story img Loader