जो आपला प्रांत नाही तेथे जाऊन लुडबूड करण्यात एक मजा असते. गायकांचा जो गळा ते माझ्यासाठी नरडं. जमत नसल्यानं संगीत हा माझा ‘विक पॉईंट’ आहे. कळतं असा दावा नाही. पण, ऐकायला आवडतं. तुम्ही लोक गुणगुणता तरी. त्यामुळे मला आदर वाटतो. मी स्नानगृहामध्येही गात नाही. उस्ताद रशीद खाँ माझा चांगला मित्र आहे. कधी इच्छा झाली आणि एक फोन केला की तो माझ्यासाठी पलीकडून गायन ऐकवितो. माझ्यासारख्या बेसुऱ्या माणसावर कलाकार प्रेम करतात. खरोखरीच मी भाग्यवान.. नाना पाटेकर यांनी खास आपल्या शैलीत एक सुरेल शब्दमैफल रंगविली.
प्रसिद्ध गायिका मंजूषा कुलकर्णी यांच्या ‘मोहे रंग दे’ या सीडीचे प्रकाशन नाना पाटेकर यांच्या हस्ते झाले. या सीडीतील रचना स्वरबद्ध करणारे ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, उद्योजक विजय पुसाळकर आणि तबलावादक विजय घाटे या वेळी उपस्थित होते.
पैसे मिळतात म्हणून एकाच प्रकारच्या भूमिका करायला लागलो. लोकांना त्याचा कंटाळा आला. ‘पक पक पकाक’मधील भुत्या किंवा ‘खामोशी’ करायला मिळाला.  ‘वेलकम’ चित्रपटाने माझ्यामध्ये मुळात असलेला नाठाळपणा अनुभवता आला. रसिकांना सतत नवे हवे असते, असे सांगत पाटेकर म्हणाले, मंजूषाचा जीव इतकासा, पण, स्वरांमध्ये ती इतकी दूर पोहोचली आहे की तिचा आवाज म्हणजे जणू तलवारच! ‘जोहार मायबाप’ गावे तर तिनेच. तिचे शब्दांचे उच्चार छान आहेत. अभंग, शास्त्रीय गायन हा मंजूषाचा बाज आहे. ते तर खरच. पण, असे वेगळे प्रयोग माणसाला खूप काही शिकवून जातात. त्याच्या व्यक्तिमत्त्वामध्ये भर पाडतात. अशोकराव इतका साधा माणूस मी पाहिला नाही. ते नव्यांना वाव देतात. मी अजून वाट पाहतो आहे. कारकिर्दीचा शेवट करताना माझी आठवण झाली तर एखाद्याजिंगलसाठी तरी माझा आवाज वापरा. मी स्वत:ला धन्य समजेन.
शास्त्रीय बाजाचं सुगम संगीत कसे म्हणावे याचे मार्गदर्शन मला पत्कीकाकांकडून मिळालेच. पण, त्यांच्याकडून खूप काही शिकता आले याचा आनंद असल्याची भावना मंजूषा कुलकर्णी यांनी व्यक्त केली. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
‘जोहार मायबाप’च्या सुरांची मोहिनी
‘मोहे रंग दे’ यासह या सीडीतील आणखी एक रचना मंजूषा कुलकर्णी यांनी सादर केली. त्यांना सचिन जांभेकर यांनी संवादिनीची, प्रसाद जोशी यांनी तबल्याची आणि उद्धव कुंभार यांनी तालवाद्याची साथसंगत केली. अखेर नाना पाटेकर यांच्या आग्रहास्तव ‘जोहार मायबाप’ ही भैरवी सादर करीत मंजूषा कुलकर्णी यांनी मैफलीची सांगता केली तेव्हा नाना पाटेकर यांनी त्यांना लवून नमस्कार केला.