जातिपातीचा आधार घेत मूठभर राजकारणी भावना भडकावतात. त्यांची गचांडी धरा. एक विचित्र आहे म्हणून समाजाला वेठीस धरणे योग्य आहे का? आज भाषण करणाऱ्याची वर्षभरात किती संपत्ती जमा होते. त्यांना आपण प्रश्न विचारणार की नाही. तुम्ही एक एक अॅटमबॉम्ब आहात. मी एखादा गलिच्छ चित्रपट केला तर तो जसा पाडता तसे तुम्ही या राजकारण्यांनाही पाडा. हातामध्ये दगड घेऊन भिरकावणे सोपे आहे, पण हा दगड आपण आपल्याच नपुंसकत्वावर मारलेला असतो. धर्म घरात ठेवायचा. रस्त्यावर आल्यानंतर आपण भारतीय असलं पाहिजे..
..‘नाना’मधील बाप जागा होतो, तेव्हा युवा पिढीही त्याचे मनापासून ऐकते याची प्रचिती गुरुवारी आली. पुणे पोलिसांतर्फे ‘ऑनलाइन तरुणाई.. पुणे पोलिसांचा तरुणाईशी संवाद’ या कार्यक्रमात नानाने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पोलीस आयुक्त सतीश माथूर, सहआयुक्त संजय कुमार, महापौर चंचला कोद्रे, संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले, ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक संजय आवटे, आमदार गिरीश बापट या वेळी उपस्थित होते. फेसबुकवर महापुरुषांच्या अवमानकारक मजकुरानंतर उद्भवलेली तणावाची परिस्थिती पुन्हा होऊ नये या उद्देशातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
‘‘स्वातंत्र्यासाठी माझे वडील, आजोबा यांनी रक्त आटवले आहे. माझी पिढी काय किंवा तुमची पिढी काय, आपल्याला सहज आणि फुकट मिळाले असल्याने स्वातंत्र्याची किंमत नाही. मी नट असल्याने बोलून-सांगून माझी घुसमट बाहेर काढू शकतो, पण तुम्ही घुसमट बाहेर काढण्यासाठी बस जाळणार आणि माझ्याच मुस्लिम भावाचे दुकान फोडणार का? असा सवाल अभिनेता नाना पाटेकर याने केला. धर्म हा मला जन्माने चिकटला आहे. हिंदूू आणि मुस्लिमांनी एकमेकांचा आधार होत विश्वास संपादन करायला हवा.’’
‘‘मी काही बोधामृत पाजण्यासाठी आलेलो नाही. काय करायचे हे मी सांगणार नाही. तुम्हीच ते ठरवायचे आहे. माझे हात पसरण्यासाठी नाहीत तर देण्यासाठी आहेत. सामान्यांमधूनच एखादा नरेंद्र मोदी होऊ शकतो. शेतकऱ्याचा मुलगा शरद पवार होऊ शकतो. कोकणातील सामान्य घरातील मुलगा नाना पाटेकर होतो, पण भ्रष्ट राजकारण्यांना पाडलेच पाहिजे, असेही नानाने ठणकावून सांगितले. ४२ वर्षे झाली मी करमणूक करतोय. त्या बदल्यात प्रेम आणि पैसेही मिळाले. तुम्ही मला मल्हारसारखे म्हणजे मुलासारखे आहात. आज इतक्या मुलांचा मी बाप झालो,’’ अशी भावनाही नानाने व्यक्त केली.
‘फेसबुक अॅडिक्शन डिसऑर्डर’ हा विकार म्हणून समाविष्ट करण्यासंदर्भात जगभरातील मानसोपचारतज्ज्ञ विचार करीत असल्याचे सांगून अच्युत गोडबोले म्हणाले, तंत्रज्ञानाच्या क्रांतीने बातमी तातडीने पसरते. या क्रांतीचे चांगले आणि वाईट परिणाम आहेत. नव्या माध्यमांनी जग जवळ आले असले तरी प्रत्यक्षातील संवाद संपला आहे.
‘..तर प्लँचेट प्रकरणाचा तपास व्हावा’
वर्ष होत आले तरी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी सापडत नाहीत ही खेदाची बाब आहे. हे मारेकरी शोधण्यासाठी प्लँचेटचा वापर झाला असेल असे वाटत नाही, पण हे खरे असेल, तर प्लँचेट प्रकरणाचा तपास झाला पाहिजे, असे नाना पाटेकर याने पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Story img Loader