गुन्हा हा समाजाचा अविभाज्य घटक आहे. पण, एखादा केलेला गुन्हा पुन्हा घडू नये यासाठी प्रयत्न करायला हवेत, पण त्या गुन्ह्य़ाचं समर्थन करायला लागलं की गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागते. रस्ता चुकलेल्या गुन्हेगारांना समाजाने सहानुभूती देऊन मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत करण्याची आवश्यकता आहे. त्याबरोबरच गुन्हेगारीकडे वळणारी पावले रोखण्यासाठी समाजानेही आपली भूमिका सतत बदलत ठेवली पाहिजे, असे मत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
पुणे शहर पोलिसांच्या वतीने पोलीस रेिझग डे निमित्ताने ‘संवाद परिवर्तनाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटेकर बोलत होते. याप्रसंगी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, पोलीस आयुक्त सतीश माथूर, पोलीस सहआयुक्त संजय कुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, डॉ. शहाजी सोळुंके, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले आदी उपस्थित होते. यावेळी जन्मठेपेची चौदा वर्षांपर्यंतची शिक्षा भोगताना विविध प्रकारच्या तब्बल अकरा पदव्या घेऊन आपले शिक्षण पूर्ण करणारे संतोष शिदे आणि सोळा वर्षे शिक्षा भोगल्यानंतर एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुधारलेले प्रवीण पाटील या दोघांचा सत्कार पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आला.  
आपल्याजवळ असलेल्या गोष्टीचे कौतुक करायला शिका. आपले आयुष्य छान आहे, मात्र तुम्ही ते कठीण करून ठेवले आहे. जबाबदारी घेऊन स्वत:चे आई-वडील व्हा त्यामुळे चांगले वाईट समजेल. आपल्याला प्रत्येक वेळी दुसऱ्याकडे बोट दाखविण्याची सवय लागली आहे. गुन्ह्य़ाचे समर्थन करू नका, लोकांना आधार वाटायला हवा असे काम करा, असा सल्ला तरुणाईला देत नाना पाटेकर म्हणाले की, आपल्यापैकी प्रत्येकजण गुन्हेगार आहे. प्रत्येकाने कुठला ना कुठला गुन्हा केलेला असतो. जो नाही म्हणतो तो लबाड माणूस असतो. पकडलो गेलो नाहीत म्हणून या बाजूला आहोत. एकमेकांना हात देऊन वर घ्यायला हवं. एकमेकांना भेटणे, समजून घेणे आवश्यक आहे. अनावधानाने घडलेल्या कृत्याचं वैषम्य वाटायला हवं. चेष्टेचे स्वरूप मोठे झाले की त्याचे परिवर्तन गुन्ह्य़ामध्ये होते. नकळत गुन्हा घडतो आणि गुन्हेगार म्हणून शिक्का बसतो. गुन्हा होतो यामध्ये काही गैर नाही. पण, त्यात न अडकता पुढे जायला हवं, असे पाटेकर यांनी सांगितले.
बापट म्हणाले की, जन्मत:च कोणी गुन्हेगार नसतो. परिस्थिती त्याला गुन्हेगार बनविते. गुन्हेगारीचा शिक्का लावला तर मनुष्याचे जीवन उद्ध्वस्त होते. आणीबाणी आणि राजकीय गुन्ह्य़ांमध्ये अडीच वर्षे कारागृहात काढली आहेत. त्यावेळी आपण कैद्यांचे जीवन पाहिले आहे. कुटुंबव्यवस्था कोलमडल्यामुळे गुन्हेगारीत वाढ झाली असून संस्काराची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची आवश्यकता आहे. याबरोबरच राजकारण्यांनी स्वत:ची प्रतिमा बदलण्याची गरज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा