कसबा पोटनिवडणुकीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केले आहे. पोटनिवडणुकीबाबत भाजपाचा प्रस्ताव काय येतो, त्यावर आपण बोलू, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. नाना पटोले हे पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी भाष्य केले.
कसबा विधानसभा पोटनिवडणूक आम्ही बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करू, अशी भूमिका भाजपाचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मांडली आहे. तो प्रस्ताव तुमच्यापर्यंत आल्यावर काय भूमिका राहणार त्यावर ते म्हणाले की, महाराष्ट्राची एक पंरपरा राहिली आहे. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास ती निवडणूक बिनविरोध करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यावर त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीत आल्यावर ती बिनविरोध केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात पंढरपूर, देगलूर, कोल्हापूर यासह अनेक ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत संबधित कुटुंबातील व्यक्तीला भाजपाने विरोध करण्याचे काम केले आहे. त्यामुळे आता भाजपाचा नेमका प्रस्ताव काय येतो, पण अजून प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे त्यांचा प्रस्ताव काय येतो त्यावर आपण बोलू, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली.
कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातील अनेक जण इच्छुक आहेत. उमेदवारांची रीघ लागली असून, 8 ते 10 जणांनी माझ्याकडे अर्ज केले आहेत. १९८० पर्यंत काँग्रेस पक्षाचे प्राबल्य होते. हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे आणण्यासाठी आमचा मास्टर प्लान तयार आहे. त्यावर आमचे काम सुरू आहे. ३ किंवा ४ फेब्रुवारी पर्यंत आमचा उमेदवार जाहीर करू, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली.