पुणे : ३६ वी पुणे आंतरराष्ट्रीय नाईट मॅरेथॉन स्पर्धेत दरवर्षीप्रमाणे यंदा देखील इथिओपियाच्या स्पर्धकांनी बाजी मारली असून प्रथम क्रमांक लेटा तेस्फाये गुटेटा, द्वितीय क्रमांक उर्गा केबुबे आणि तृतीय क्रमांक यीबेगता झेंगेटा यांनी पटकावला. या विजेत्या स्पर्धकांना काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांसोबत देखील संवाद साधला.यावेळी नाना पटोले म्हणाले की, मागील ३६ वर्षापासुन मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली जात आहे. या स्पर्धेत राज्यासह देश विदेशातील स्पर्धक सहभागी होतात. त्यामुळे आपल्या कलागुणांना वाव मिळण्यास मदत होते. यंदा अनेक गटांत भारतीय खेळाडूंनी देखील पदके जिंकली आहेत. ही आनंदाची बाब असून येत्या काळात देखील आपल्या खेळाडूंनी पदके जिंकावीत. काँग्रेस पक्ष सदैव खेळाडूंच्या पाठीशी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर भाजपकडून कारवाई केली जात नाही. त्यावरून उदयनराजे आक्रमक झाले आहेत. त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, यापूर्वी देखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल विधान केले होते. त्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल विधान केले आहे. या दोन्ही घटनेनंतर काँग्रेस पक्षाकडून जाहीर भूमिका मांडत निषेध नोंदविला आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. पण त्यावर भाजप नेतृत्वाकडून अद्याप कोणत्याही प्रकारची भूमिका मांडण्यात आलेली नाही. पण त्याच दरम्यान भाजप नेत्यांची आजवरची विधान लक्षात घेता त्या माध्यमातून पेशवाई आणण्याचा प्रयत्न दिसत आहे. त्यामुळे त्यानं पेशवाई किंवा शिवशाही सोबत राहायचे आहे हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले पाहिजे. पण काँग्रेस पक्ष कायम शिवशाही सोबत असल्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
तसेच ते पुढे म्हणाले की,भाजपकडून सतत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचे काम केले जात आहे. तो राज्यातील जनतेचा अवमान आहे. त्यामुळे राज्यातील जनता भाजपला कधीच माफ करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाषेत सांगायचे झाल्यास, त्यांना माफी नसून अभद्र आणि अवैचारिक ईडी सरकारचा लोकशाही मार्गाने काँग्रेस पक्ष कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही. यासाठी जनता आमच्या सोबत असल्याचे सांगत त्यांनी यावेळी शिंदे फडणवीस सरकारवर देखील निशाणा साधला.गुजरातमधील भाजपच्या काही नेत्यांच्या मनामध्ये कायम महाराष्ट्राबाबत द्वेष दिसत आहे. त्यातूनच आता महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा विचार केला जात असून सोलापूर, सांगली येथील काही गाव कर्नाटकला जोडण्याचं कटकारस्थान भाजप करीत आहे. भाजपचे हे कटकारस्थान काँग्रेस यशस्वी होऊ देणार नसून काँग्रेस पक्ष महाराष्ट्राचे तुकडे कधीच कधीही होऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत थोडा जरी स्वाभिमान असेल तर जे आज मंत्री,खासदार आणि आमदार झाले आहेत. ते खुर्ची सोडू शकतात का ? पण तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान सहन करायचाच असेल आणि खुर्ची सोडायची नसेल तर तुम्ही ते करा. आमचं काहीही म्हणणं नाही. आम्ही जबरदस्ती करणार नाही अशी भूमिका मांडत नाना पटोले यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली.