पिंपरी चिंचवड: सचिन वाझे यांच्या आरोपानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आक्रमक झाले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांचं हे नाटक सुरू असल्याचं विधान त्यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे असलेली ऑडिओ- व्हिडिओ क्लिप सर्वांसमोर आणावी. परंतु, ते असं न करता यावरून राजकारण करत आहेत. विरोधकांना धमकावत आहेत, असा आरोप पटोले यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार येताच आम्ही या प्रकरणाची चौकशी करून दूध का दूध आणि पाणी का पाणी करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पटोले म्हणाले, राज्याचे गृहमंत्री सांगतात की माझ्याकडे ऑडिओ- व्हिडिओ क्लिप आहेत. कधी अनिल देशमुख सांगतात की माझ्या जवळ पुरावे आहेत. यावरून हा निकाल इथं लागेल असं वाटत नाही. पुढे ते म्हणाले, याविषयावर जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा आम्ही चौकशी लावू. मग आम्ही दूध का दूध आणि पाणी का पाणी करू. जो दोषी आहे, त्याच्यावर कारवाई करू ही आमची भूमिका आहे.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवड: चिमुकली गिरीजाच्या मृत्यू प्रकरणी ‘त्या’ सोसायटी मालकावर गुन्हा दाखल
पुढे ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस गेल्या साडेसात वर्षांपासून राज्याचे गृहमंत्री पद सांभाळत आहेत. त्यांच्याकडे ऑडिओ- व्हिडिओ असेल तर त्यांची जबाबदारी आहे. ती क्लिप बाहेर काढा. तुम्ही यावरून विरोधकांना धमकावत आहात का?, राजकारण करत आहात का? यावर देवेंद्र फडणवीस बोलायला तयार नाहीत. म्हणून आम्ही सांगत आहोत, आमचं सरकार आल्यास आम्ही दूध का दूध आणि पाणी का पाणी करू. पुढे ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचं नाटक सुरू आहे. त्यांच्याकडे ऑडिओ क्लिप आहे की नाही, यावरून त्यांचं नाटक सुरू आहे.