पुणे : राज्यपाल भवन हे भाजप भवन झाले होते. ही भूमिका आजपर्यंत सातत्याने मांडत होतो. राज्यपालांच्या पत्रातून ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मागणीनुसार त्यांना पदमुक्त न करता राष्ट्रपतींनी त्यांची हकालपट्टी करावी, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीला शुभेच्छा, असेही त्यांनी सांगितले.पदमुक्त होण्याची इच्छा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मुंबई भेटीत व्यक्त केली होती. या संदर्भात राजभवनकडून पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेसच्या ‘हाथ ते हाथ जोडो’ अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आलेले नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपला अधिकाधिक फायदा कसा होईल, यासाठी राज्यपालांनी काम केले आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासंदर्भात त्यांनी केलेल्या विधानातून त्यांच्या मनात किती पाप आहे, हे दिसून आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सतत वादग्रस्त विधान करीत राहिल्याने त्यांची पदावरून हकालपट्टी केली पाहिजे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना स्वेच्छेने मुक्त न करता राष्ट्रपतींनी हकालपट्टी करावी, अशी मागणी आहे, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांच्याशी माझी चर्चा झाली. काँग्रेसची भूमिका त्यांच्यापुढे मांडली आहे, असे नाना पटोले यांनी एका प्रश्नाला उत्तर दिले.

आधीच हकालपट्टी करायला हवी होती -उद्धव ठाकरे
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या महापुरुषांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी त्यांचे एकूण वर्तन लक्षात घेता कोश्यारी यांची आधीच हकालपट्टी व्हायला हवी होती, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. राज्यपालांना लवकर घरी पाठविले पाहिजे, असे मतही त्यांनी मांडले.

पदमुक्त करा -जयंत पाटील
पंतप्रधानांनी त्यांच्या लेखी निवेदनातील विनंतीचा विचार करून कोश्यारी यांना पदमुक्त करावे, अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडली. मधल्या काळात राज्यपालांनी जी वक्तव्ये केली ती बघता महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. आता राज्यपालांनीच इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या इच्छेचा आदर व्हावा, असे मत पाटील यांनी मांडले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole demand to expel the governor bhagat singh koshyari amy