पुणे : “माणसाला प्रगती करायची असेल तर उद्योग-व्यवसायाशिवाय पर्याय नाही. १३ वर्षे नोकरी केली पण ते आपले काम नाही म्हणून सोडून दिली. रस्त्यावर फटाके विकण्यापासून ते मराठी माणूस जो व्यवसाय करत नाही असा मटण, चिकनचा व्यवसाय केला. माणसाला प्रगती करायची असेल तर लाज लज्जा बाळगून चालत नाही,” असे मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले. ते लोणावळ्यात भाजपा आणि कोळी महासंघ यांनी आयोजित केलेल्या स्वयंरोजगार मेळाव्यात बोलत होते.
हेही वाचा – पुणे : दुचाकी चोरट्याला आठ महिने सक्तमजुरीची शिक्षा
नारायण राणे म्हणाले की, उद्योग हा माणसाला प्रगतीकडे घेऊन जातो. सुखी समाधानी, आनंदी जगायचं असेल आणि पुढील पिढी सक्षम करायची असेल तर उद्योगाशिवाय मार्ग नाही. मीदेखील १३ वर्षे नोकरी केली. पण मला कळलं की हे माझं काम नाही. दीड ते दोन हजार पगार मिळायचा. तोही घरी पोहचेपर्यंत मित्र भेटले की संपायचा. मी मुंबईत अनेक व्यवसाय केलेत. नारायण राणे हे नाव फार मोठं वाटते. पण मी छोटे छोटे व्यवसाय केले. रस्त्यावर फटाके विकले, गॅरेज, टॅक्सी, टेम्पो असे अनेक व्यवसाय केले. मराठी माणूस जो व्यवसाय करत नाही तोही केला. मटण, चिकनचा व्यवसाय केला. माणसाला प्रगती करायची असेल तर लाज लज्जा बाळगून चालत नाही. मेहनत, परिश्रम याला बुद्धिमत्तेची जोड असेल तर प्रगती होते, असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला. दिवसा नोकरी रात्री शाळा हे करून आज इथपर्यंत मी पोहोचलो आहे. राजकारणातील सर्व पदे उपभोगली आहेत असेही राणे म्हणाले.