अघोरी अंधश्रद्धांना ज्या समाजात मोठय़ा प्रमाणावर जनता बळी पडते तेथे त्याविरोधात कायदे असणे महत्त्वाचे असते. त्यामुळेच जादूटोणाविरोधी कायद्यासारखा कायदा देशभर व्हायला हवा, असे मत उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी व्यक्त केले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी मांडलेले विवेकवादाचे विचारच देशाला प्रगतीपथावर नेतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
डॉ. दाभोलकर लिखित ‘तिमिरातूनि तेजाकडे’ या पुस्तकाच्या ‘अंधश्रद्धा उन्मूलन आचार, विचार और सिद्धांत’ या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन उपराष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. राजकमल प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. खासदार हुसेन दलवाई, प्रसिद्ध हिंदी लेखक नामवर सिंह, गांधी स्मारकच्या संचालक श्रीमती मणिमाला, पुस्तकाचे संपादक सुनीलकुमार लवटे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, मुक्ता दाभोलकर आदी त्या वेळी उपस्थित होते.
अन्सारी म्हणाले, सामाजिक सुधारणांसाठी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम हे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. या कामाच्या पाठीशी असलेले विवेकवादाचे सूत्र केवळ अंधश्रद्धा निर्मूलनासाठीच नाही, तर आयुष्याच्या सर्व लढायांमध्ये महत्त्वाचे आहे. एकदा माणसाचे विचार पक्के झाल्यावर हे काम करणे अवघड होते, म्हणून विवेकी मन घडवण्याचे काम हे शाळा आणि महाविद्यालयांच्या मधून होणे आवश्यक आहे. डॉ. दाभोलकरांच्या अनुपस्थितीमध्ये हे पुस्तक प्रकाशित करावे लागत असल्याचे आपणास दु:ख असून, समाजहिताचे काम करणाऱ्या डॉ. दाभोलकारांचा आपल्या समाजात खून होतो ही निंदनीय बाब आहे. ज्या दिवशी डॉ. दाभोलकरांचा खून झाला तो वीस ऑगस्टचा दिवस भारताच्या इतिहासातील काळा दिवस आहे. त्यांचे मारेकरी लवकर पकडले जावेत.
अविनाश पाटील म्हणाले, डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या पश्चात अंनिसचे काम निर्धाराने चालू असून या पुस्तकाने अंनिसचे काम हिंदी भाषिक लोकांमध्ये पोहचण्यास मदत होईल.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा