विवेकाच्या प्रतिष्ठापनेसाठी प्राण गमावलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमधील मारेकऱ्यांचा तपास करण्यासंदर्भात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे गुन्हे अन्वेषण शाखेकडे (सीबीआय) पाठपुरावा करण्यासाठी लवकरच दिल्ली येथे जाऊन कृती आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दर महिन्याच्या २० तारखेला राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ात निषेध कृती केली जाणार आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अकोला येथे झालेल्या राज्यस्तरीय विस्तारित बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समितीचे सचिव मििलद देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. या बैठकीस डॉ. हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, अविनाश पाटील, सुशीला मुंडे, माधव बावगे उपस्थित होते. डॉ. दाभोलकर यांचा १ नोव्हेंबर हा जन्मदिन हा युवा संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात औरंगाबाद येथे १ आणि २ नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी युवा संकल्प परिषदेने होणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी नोव्हेंबर महिना युवा संकल्प महिना म्हणून पाळला जाणार आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.
समितीच्या लोकरंग मंचतर्फे ‘िरगण’ या नाटय़ाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग सोमवारी (२० ऑक्टोबर) एस. एम. जोशी सभागृह येथे सायंकाळी सहा वाजता होणार आहे. याच कार्यक्रमात ‘साधना साप्ताहिका’च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन प्रसिद्ध दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांच्या हस्ते होणार आहे. त्यापूर्वी दाभोलकर यांच्या हत्येचे सूत्रधार लवकर शोधावेत या मागणीसाठी समितीचे कार्यकर्ते दुपारी चार वाजता महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर एकत्र येणार आहेत, असेही देशमुख यांनी सांगितले.
फटाक्यांची आतषबाजी करू नये
विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवारी (१९ ऑक्टोबर) लागत असून विजयी उमेदवारांनी फटाक्यांची आतषबाजी न करता आनंद साजरा करावा, असे आवाहन मििलद देशमुख यांनी केले. समितीतर्फे फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेण्याची मोहीम सुरू आहे. त्यामुळे विजयाचा आनंद साजरा करताना प्रदूषणामध्ये वाढ होईल असे वर्तन राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी करू नये, असेही ते म्हणाले.