पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जिवाला धोका असल्याबाबत तक्रार नोंदविली नव्हती, अशी माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) तत्कालीन तपास अधिकारी एस. आर. सिंग यांनी मंगळवारी उलट तपासणीत न्यायालयात दिली.
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सीबीआयचे तपास अधिकारी एस. आर. सिंग यांची उलटतपासणी बचाव पक्षाच्या वकील ॲड. प्रकाश साळशिंगीकर मंगळवारी (२२ ऑगस्ट) घेतली. डाॅ. दाभोलकर यांच्या शरीरात शिरलेल्या गोळ्या आणि घटनास्थळी सापडलेल्या रिकाम्या पुंगळ्या शस्त्रास्त्र तज्ज्ञाला (बॅलेस्टिक एक्सपर्ट) दाखवले होते का?, दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी कोणत्या बनावटीचे पिस्तूल वापरले होते, याबाबत विचारणा केली होती, असे प्रश्न ॲड. साळशिंगीकर यांनी सिंग यांच्याकडे उपस्थित केले. बचाव पक्षाच्या वकिलांनी विचारलेल्या प्रश्नांना सिंग यांनी ‘नाही,’ असे उत्तर दिले.
डॉ. दाभोलकर यांचे नरेंद्र महाराज आणि त्यांच्या अनुयायांसोबत वैमनस्य होते का? असा प्रश्न ॲड. साळशिंगीकर यांनी उपस्थित केला. त्यावर सिंग यांनी ‘हो’असे उत्तर दिले. घटनास्थळाजवळ नरेंद्र महाराजांचे कोणी अनुयायी होते का? याबाबत तपास केला का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. तेव्हा सिंग यांनी ‘नाही’, असे सांगितले. जुलै २०१३ मध्ये तोतया डॉक्टरांविरोधात त्यांनी आंदोलन केले होते, तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील गैरव्यवहारातून त्यांची हत्या झाल्याच्या शक्यतेने तपास केला का?, असा प्रश्न सिंग यांच्याकडे उपस्थित करण्यात आला. या प्रश्नावर सिंग यांनी ‘नाही’ असे सांगितले. या खटल्याची पुढील सुनावणी बुधवारी (२३ ऑगस्ट) होणार आहे.