डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला न्यायालयाकडून १६ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनाविण्यात आली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) तावडेला काल मुंबईतून अटक केली होती. त्यानंतर आज त्याला नवी मुंबईच्या सीबीआय कार्यालयातून पुण्यात आणण्यात आले. येथील शिवाजीनगर न्यायालयात त्याला सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते. यावेळी वीरेंद्र तावडेच्या बचावासाठी सनातन संस्थेच्या वकिलांची मोठी फौज न्यायालयात उपस्थित होती. यावेळी सीबीआयच्या वकिलांनी वीरेंद्र तावडे हा २००९ पासून फरार असलेला सनातनचा साधक सारंग अकोलकर यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले. याशिवाय, डॉ. दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या काळ्या रंगाच्या मोटरसायकलशी सार्धम्य असणारी मोटारसायकल वीरेंद्र तावडे याच्याकडे सीबीआयला सापडली होती. तसेच तावडेने डॉ. दाभोलकरांच्या हत्येपूर्वी कोल्हापुरात त्यांच्याविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्य केल्याचेही तपासात स्पष्ट झाल्याची बाब सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयासमोर ठेवली.
डॉ. तावडे हा सनातन संस्थेच्या हिंदू जनजागृती समितीचा कार्यकर्ता आहे. तीन वर्षांपूर्वीच्या या हत्याकांडावरून झालेली ही पहिलीच अटक असून या प्रकरणाच्या संथगती तपासाबद्दल न्यायालय तसेच माध्यमांमधून यंत्रणेवर जोरदार टीका होत होती. डॉ. तावडे याला शुक्रवारी दुपारी सीबीआय कार्यालयात बोलाविण्यात आले होते. त्यानंतर रात्री नऊ वाजता त्याला अटक झाली होती.
Narendra Dabholkar murder case: Accused Virendra Tawde being taken to Pune from CBI office in Navi Mumbai pic.twitter.com/ZAYzAQty5M
— ANI (@ANI_news) June 11, 2016