डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासासाठी पाच राज्यांत पुणे पोलिसांची पथके जाऊन आली आहेत. सध्या काही पथके उत्तरप्रदेश आणि गोव्यामध्ये ठाण मांडून आहेत. त्या ठिकाणी आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांना माहिती देणारी काही निनावी पत्रे आणि फोन आले असून, त्याची शहानिशा केली जात आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी दिली. या खुनाचा तपास नक्की लावला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट रोजी महर्षी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या झाली होती. या गुन्ह्य़ाच्या तपासासाठी पुणे पोलिसांबरोबर राज्यातील पोलीस तपास घेत आहेत. डॉ. दाभोलकर यांच्या खुनाचा तपास हा पोलिसांच्या प्रतिष्ठेचा झाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पुणे पोलिसांची बावीस पथके गुन्ह्य़ाचा तपास करीत आहेत. मात्र, त्यांना यामध्ये यश आलेले नाही. या गुन्ह्य़ाचा तपास सुरू असताना पुण्यातील खून, बलात्कार, अग्निशस्त्राचा वापर करून झालेले गुन्हे असे एकूण २२ गुन्हे उघडकीस आले आहेत. खुनाच्या गुन्ह्य़ातील हा सर्वात मोठा असून सर्व गोष्टीं पडताळून पाहिल्या जात आहेत.
याबाबत भामरे यांनी सांगितले की, पुणे पोलिसांची पथके आतापर्यंत पाच राज्यात जाऊन आली आहेत. दैनंदिन माहितीमध्ये भर पडत आहे. पोलिसांना अनेक माहिती देणारी निनावी पत्रे आणि फोन आले आहेत. आतापर्यंत अग्निशस्त्राचा वापर करून गुन्हे करणाऱ्या ६३५ गुन्हेगार, ७८७ सराईत गुन्हेगार आणि एक हजार १८ लोकांकडे गुन्ह्य़ाबाबत चौकशी केली आहे. संवेदनशील प्रकरण असल्यामुळे सर्व काळजी घेऊन तपास केला जात आहे. या गुन्ह्य़ाचा तपास नक्की लागेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा