डॉ. नरेंद्र दाभोलकर हे अत्यंत स्पष्टवादी समाजसुधारक होते. त्यांचे विचार लोकांना निटपणे कळणारे होते. त्यात द्विधाभाव नव्हता, असे विचार ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नीळकंठ रथ यांनी व्यक्त केले.
साधना ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. दाभोलकर यांच्या लेखांचा समावेश असलेल्या ‘समता संगर’ व साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांच्या ‘सम्यक सकारात्मक’ या पुस्तकांचे प्रकाशन डॉ. रथ व ‘आयबीएन लोकमत’ चे संपादक निखिल वागळे यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष हमीद दाभोलकर, साधनाचे संपादक शिरसाठ व सहयोगी संपादक अभय टिळक त्या वेळी उपस्थित होते.
डॉ. रथ म्हणाले की, वैरभाव व विषमता या गोष्टींना दूर ठेवण्याचा साधनेचा मूळ हेतू आहे. साधनेच्या सर्व संपादक या विचारांना धरून होते. त्यात दाभोलकर हे अत्यंत स्पष्टवादी होते. ही बाब त्यांच्या बाबतीत प्रामुख्याने जाणवली. लोकांमध्ये जाऊन ते लोकांचे शिक्षण करीत होते. लोकशिक्षणाबरोबरच कायदाही झाला पाहिजे, हे त्यांच्या लक्षात आले होते. म्हणूनच त्यांनी अंधश्रद्धेबाबतच्या कायद्याचा आग्रह धरला. कोणतीही सुधारणा करायची झाल्यास ती लोकांत जाऊनच करावी लागेल.
शिरसाठ म्हणाले की, राज्यकर्त्यांच्या असंवेदनशीलता व आंदोलनांबाबतच्या अनास्थेबाबत डॉ. दाभोलकरांच्या लेखनामध्ये सातत्याने खंत होती. ही अनास्था त्यांच्या मृत्यूनंतरही संपली नाही. त्याच्या खुनाच्या तपासाबाबत पोलीस प्रामाणिकपणे काम करीत असल्याचे आम्ही लोकांना सांगतो. पण, लोकांना त्यावर विश्वास बसत नाही. सरकारची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे. सीबीआयकडे तपास सोपविणे, ही राज्य शासनासाठी शरमेची गोष्ट आहे. त्यासाठी शासनाने स्वत:हून जाहीर माफी मागितली पाहिजे.
वागळे म्हणाले की, विवेकवाद म्हणजे नेभळटपणा नव्हे. शासन जागे होणार नसेल, तर त्यासाठी कोणता वेगळा मार्ग निवडावा, याचाही विचार व्हावा. दाभोलकर यांना राजकारण व माध्यमांची उत्तम जाण होती. त्यातूनच त्यांनी माध्यमांच्या व्यासपीठाचा प्रभावी वापर करून मूठभर लोकांना घेऊन अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ उभी केली.

Story img Loader