अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र अच्युत दाभोलकर यांच्या पार्थिवावर येथे रात्री उशिरा अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
डॉ. दाभोलकरांवर खुनी हल्ला झाल्याचे समजताच सकाळीच त्यांच्या शाहूनगर येथील निवासस्थानाकडे अंनिसच्या कार्यकर्त्यांसह सर्वानीच धाव घेतली. दुपारी चापर्यंत शोकाकुलांची या गर्दीत मोठी वाढ झाली. पाचच्या दरम्यान त्यांचे पार्थिव पुण्याहून साताऱ्यात त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. या वेळी डॉ. दाभोलकरांच्या नातेवाइकांना आपल्या भावना या वेळी अनावर झाल्या. कार्यकर्त्यांनाही आपला शोक लपविता आला नाही. त्यानंतर त्यांचे पार्थिव घरासमोरील मैदानावर मंडपात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर. आर. पाटील, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, पालकमंत्री शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, एन. डी. पाटील, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. आ. ह. साळुंखे, कॉ. कृष्णा खोत, कल्पनाराजे भोसले, विलासराव पाटील उंडाळकर, आ. जयकुमार गोरे, अशोक गायकवाड, वर्षां देशपांडे, उदय चव्हाण आदींसह अनेकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
दरम्यान भावना अनावर झालेल्या काही कार्यकर्त्यांनी या वेळी मुख्यमंत्र्यांसमोर जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र्यांच्या गाडीला घेराव घातला. आरोपींच्या अटकेची व सखोल चौकशीची मागणी केली. रात्री सव्वाआठच्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीकडे हजारो कार्यकर्त्यांच्या व सर्व थरातील समाजाच्या उपस्थितीत निघाली. या वेळीही कार्यकर्त्यांनी ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर रहे’ च्या जोरदार घोषणा दिल्या. कैलास स्मशानभूमीत डॉ. हमीद दाभोलकर यांनी त्यांच्या चितेला अग्नी दिला.
अंधश्रद्धेविरोधात आयुष्यभर लढा
दाभोलकर यांनी १९८९मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. या समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ठ रुढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करण्यात येत आहे. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधीमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकर गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते. यासंदर्भात सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजून सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते. समाजातील भोंदू बाबांचे पितळ दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते. पुरोगामी महाराष्ट्राच्या वैचारिक वर्तुळामध्ये अजातशत्रू असेच दाभोलकरांचे व्यक्तिमत्त्व होते. दाभोलकर यांचे प्राथमिक शिक्षण साताऱयामध्ये झाले. सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयातून त्यांनी विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी वैद्यकीय शाखेचे उच्च शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण केल्यावर काही वर्षे त्यांनी साताऱय़ामध्ये वैद्यकीय व्यवसायही केला होता.
दाभोलकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमुळे महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांच्या चळवळीची मोठी हानी झाली आहे.
First published on: 20-08-2013 at 09:26 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra dabholkar shot dead in gun attack by anonymous