भारताबरोबरच परदेशातही मोठय़ा प्रमाणावर आकर्षण असलेले नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व विविध लेखकांच्या चष्म्यातून उलगडणार आहे. मोदी यांच्याविषयी लेखन केलेले लेखक रविवारी (२७ जुलै) एका व्यासपीठावर येत आहेत.
मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि त्यांच्या कार्यशशैलीची भुरळ पडल्यामुळेच भारतीय तसेच परदेशी लेखकांनीही मोदी यांच्याविषयीचे विपुल लेखन केले आहे. मुख्य म्हणजे ही सर्व पुस्तके लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजेच नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्यापूर्वीची आहेत. काही पुस्तकांचे स्वतंत्र लेखन झाले असून काही पुस्तके अनुवादरूपाने वाचकांसमोर आली आहेत. अशा मराठी लेखकांना एकत्र आणण्याचा योग विश्व संवाद केंद्र आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांनी जुळवून आणला आहे. गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये रविवारी सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमास गुजरातमधील प्रसिद्ध उद्योजक जफर सरेशवाला हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमामध्ये विनीत कुबेर (मोदीनामा), डॉ. शरद कुंटे (विकासपुरुष : नरेंद्र मोदी), भाऊ तोरसेकर (मोदीच का?), अॅड. मु. पं. बेंद्रे (असे आहेत तर मोदी), सुनील माळी (कहाणी नमोची, एका राजकीय प्रवासाची), सुहास यादव (नरेंद्र मोदी : राजकीय प्रवास) आणि विनय पत्राळे (नरेंद्रभाई मोदी : एक अलौकिक व्यक्तिमत्त्व) हे पुण्यातील लेखक सहभागी होणार असून प्रा. संजय तांबट त्यांच्याशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र वंजारवाडकर यांनी मंगळवारी दिली.

Story img Loader