गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी शुक्रवारी (१ नोव्हेंबर) पुण्यात येत असून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचीही या वेळी उपस्थिती असेल. या दौऱ्याच्या तयारीसाठी शहर भारतीय जनता पक्षातर्फे शनिवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
मोदी यांच्या दौऱ्यात शहर भाजपतर्फे त्यांचे जंगी स्वागत केले जाणार असून लोहगाव विमानतळापासून स्वागताचा प्रारंभ होईल. मोदी शुक्रवारी दुपारी अडीच वाजता लोहगाव विमानतळावर येतील. भाजपचे कार्यकर्ते तेथे मोठय़ा संख्येने यावेत, असा प्रयत्न केला जाणार आहे. लोहगाव येथे मोदी यांचे कार्यकर्त्यांसमोर छोटे भाषण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होईल. दुपारी साडेचार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. लता मंगेशकर यांचीही या वेळी उपस्थिती असेल.
उद्घाटनानंतर गरवारे महाविद्यालयात मोदी यांचा जाहीर कार्यक्रम होईल. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातर्फे सायंकाळी साडेपाच वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मोदी यांच्या दौऱ्यासाठी शहर भाजपची बैठक अध्यक्ष अनिल शिरोळे, प्रदेश संघटनमंत्री रवी भुसारी, सहसंघटनमंत्री सुनील कर्जतकर, आमदार गिरीश बापट, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, प्रदेश चिटणीस योगेश गोगावले, प्रा. मेधा कुलकर्णी, माजी मंत्री दिलीप कांबळे, प्रदेश कार्यकारिणी श्रीनाथ भिमाले, गणेश बीडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी आयोजित करण्यात आली होती.

Story img Loader