लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्याइतके प्रभावी मार्केटिंग आजपर्यंत कोणीच केले नाही. सोप्या आणि प्रभावी घोषणा, सोशल मीडियाचा वापर करीत देशभर प्रवास करून त्यांनी मतदारांशी सुसंवाद साधला. हे सगळे नियोजनबद्ध होते. या मार्केटिंगच्या जोरावरच मोदी आणि भाजपने सत्ता काबीज केली, असे मत ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांनी व्यक्त केले.
‘समवेदना’ संस्थेच्या ११ व्या वर्धापनदिन कायर्यक्रमात पाडगावकर बोलत होते. संस्थेचे डॉ. चारुदत्त आपटे, डॉ. प्रकाश तुळपुळे, नितीन देसाई, बापू पोतदार आणि रमाकांत तांबोळी उपस्थित होते.
लोकसभा निवडणूक आणि मोदी सरकारपुढील आव्हानांचा परामर्श पाडगावकर यांनी घेतला. ते म्हणाले, पूर्वी धर्म, जातीपातीचे राजकारण केले जायचे. मात्र, या निवडणुकीत विकासाचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. जातीचे राजकारण करणारे पक्ष या निवडणुकीत सपशेल अपयशी ठरले. डाव्या पक्षांचेही अस्तित्व उरले नाही. काँग्रेसने आर्थिक विकासाच्या दृष्टीने चांगले काम केले होते. मात्र, त्यांना त्याचे मार्केटिंग करता आले नाही. देशातील मतदारांशी भाजपइतका उत्तम संवाद काँग्रेसला साधताच आला नाही. त्यामुळे काँग्रेसला अपयश आले. मोदी सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. मात्र, त्या अपेक्षा त्यांना झेपतील का याविषयी साशंकता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही भाजपचा प्रभाव दिसून येणार आहे. विद्यमान सरकारला जनता त्रासली असून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेक ऱ्यांना शोधण्यात सरकारला अपयश आले आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनमत असल्याने राज्यातही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले. प्रीती दामले यांनी आभार मानले. 

Story img Loader