कलमाडी हे भ्रष्टाचाराचे प्रतीक आहेत. आम्ही आवाज उठवल्यामुळेच त्यांना उमेदवारी मिळाली नाही. मात्र हा विषय स्थानिक असल्यामुळेच मोदी यांनी त्यांच्या पुण्यातील जाहीर भाषणात कलमाडी यांचा उल्लेख केला नाही, असे समर्थन भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले.
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत मोदी यांनी कलमाडींवर टीका केली नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सातत्याने मोदी यांच्या नावाने मते मागितली जात आहेत. मात्र मनसेबद्दलही मोदी बोलले नाहीत. त्याबाबत जावडेकर यांना विचारले असता जावडेकर म्हणाले, की मनसेबाबत भाजपने यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच मोदी यांनीही महायुतीच्याच चारही उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन सभेत केले. त्यामुळे मनसेबाबत वेगळा उल्लेख मोदी यांनी करण्याची गरज नाही. कलमाडी हे भ्रष्टाचाराचे प्रतीक आहेत. आम्हीच त्यांच्या विरोधात आवाज उठवला. त्यामुळेच त्यांना उमेदवारी मिळाली नाही. मात्र, हा विषय स्थानिक आहे. स्थानिक विषय असल्यामुळे मोदी यांनी तो घेतला नाही.
लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या सुरुवातीच्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. हे वाढीव मतदान ही मोदी लाट आहे. हे मतदान सकारात्मक आहे, असाही दावा जावडेकर यांनी केला. पंतप्रधानांचे माध्यम सल्लागार संजय बारु यांनी लिहिलेल्या पुस्तकाबाबत सोनिया गांधी यांनी खुलासा करावा आणि पंतप्रधान कार्यालयातील फाइल कोणत्या अधिकारात सोनियांकडे जात होत्या, त्याबाबतही त्यांनी खुलासा करावा, अशी मागणी जावडेकर यांनी या वेळी केली. भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी, डॉ. संदीप बुटाला, मंदार घाटे, महेश रायरीकर हेही या वेळी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा