पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज (१ ऑगस्ट) पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि टिळक स्मारक समितीच्या डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते नरेंद्र मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर आणि सरदार वल्लभभाई पटेल या महापुरुषांविषयी माहिती सांगितली. तसेच इतिहासातील अनेक घटनांचा उल्लेख केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, लोकमान्य टिळक हे संपूर्ण देशासाठी आदर्श आहेत. महाराष्ट्रातील लोकांचं त्यांच्यावर विशेष प्रेम आहे. महाराष्ट्रातील लोकांप्रमाणेच गुजरातमधील लोकांचंही लोकमान्य टिळकांशी खास नातं आहे. स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात लोकमान्य टिळक दीड महिने अहमदाबादच्या साबरमती तुरुंगात कैद होते. तसेच ते १९१६ मध्ये अहमदाबादला आले होते. तुम्हाला ऐकून आनंद होईल की, इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या काळातही लोकमान्य टिळकांच्या स्वागतासाठी त्या काळात ४० हजारांहून अधिक लोक जमले होते. त्यांचं भाषण ऐकायला तिथल्या प्रेक्षकांमध्ये सरदार वल्लभभाई पटेलही उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, त्यावेळी लोकमान्य टिळकांनी अहमदाबादमध्ये केलेल्या भाषणाची सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर वेगळी छाप पडली. त्यानंतर काही वर्षांनी सरदार पटेल जेव्हा अहमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष झाले, तेव्हा त्यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला. पटेलांनी अहमदाबादेत टिळकांचा पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला. सरदारांनी त्यासाठी जागा कुठली निवडली बघा. त्यांनी अहमदाबादेतल्या व्हिक्टोरिया गार्डनची निवड केली. हे उद्यान इंग्रजांसाठी खूप खास होतं. कारण, इंग्रजांनी राणी व्हिक्टोरियाची हिरक जयंती साजरी करण्यासाठी अहमदाबादेत १८९७ साली हे उद्यान बांधलं होतं. ब्रिटीश महाराणीच्या नावाने बनवलेल्या उद्यानात इंग्रजांच्या छातीवर सरदार पटेल यांनी देशातल्या इतक्या मोठ्या क्रातिंकारकाचा पुतळा म्हणजेच टिळकांचा पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला.

हे ही वाचा >> “दगडूशेठ पहिले व्यक्ती होते, ज्यांनी लोकमान्य टिळकांच्या आवाहनानंतर…”, नरेंद्र मोदींचं पुण्यात वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, सरदार वल्लभभाई पटेल यांनी व्हिक्टोरिया गार्डनमध्ये लोकमान्य टिळकांचा पुतळा बसवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. पण सरदार तर सरदार होते. त्यांनी सांगितलं, मी राजीनामा देऊन माझं पद सोडेन, पण पुतळा तर तिथेच बसवला जाईल. त्यानंतर १९२९ मध्ये महात्मा गांधी यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण झालं. अहमदाबादेत असताना मी अनेकदा तिथे गेलो आहे. अनेकदा त्या मूर्तीचं दर्शन घेतलं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi told story about how vallabhbhai patel installed lokmanya tilak statue in ahmedabad asc