लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मध्ये जाहीर केलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यात प्रोग्रेसिव्ह अनफोल्डनेस आहे. त्यामुळे २०१४ ते १९मध्ये काय करायचे, २०१९ ते २४ मध्ये काय करायचे, २०२४ ते २९मध्ये काय करायचे हे निश्चित आहे. त्यात मुलभूत गरजांपासून शैक्षणिक धोरण, कलम ३७० रद्द करण्यासारखे प्रोग्रेसिव्ह निर्णय घेतले. रामजन्मभूमी मुक्त केली. तिसरा टप्पा काय आहे मला माहीत नाही. तिसऱ्या टप्प्यात जगात पहिला क्रमांक मिळवण्याचा असावा. त्या दिशेने प्रवास करत आहेत. मोदींनी जगात भारताचे स्थान असे निर्माण केले, की प्रगत राष्ट्रांनी युनोचे सदस्यत्व देणार नाही अशी टेरिटरी निर्माण केली, तर मोदी नवीन युनो उभी करतील. करोना काळात मदत केलेले साठ देश भारताच्या बाजूने उभे राहतील, असे विधान उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस पुणे विद्यापीठाच्या उद्घाटन कार्यक्रमात पाटील बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष शाहू छत्रपती, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष रवींद्र आचार्य, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.
आणखी वाचा-भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर जल्लोष करणाऱ्या तरुणांवर पोलिसांकडून लाठीमार
पाटील म्हणाले, की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात जगाला काय हवे, उद्योगांना काय हवे याचा विचार केलेला आहे. विद्यापीठे छोटी असल्यास प्रयोग करता येतील. भारताकडे मोठ्या प्रमाणात तरुण आहे. जर्मनीसारख्या देशांना भारतातील तरुण हवे आहेत. त्या अनुषंगाने तरुणांमध्ये आवश्यक कौशल्ये विकसित करण्याचे नियोजन सहा मंत्र्यांचा गट करत आहे. आता संशोधन, इनोव्हेशनशिवाय आपला देश श्रीमंत होणार नाही. जगाने संशोधन करून पेटंट मिळवली. त्यातून रॉयल्टी मिळवली. मात्र गेल्या दोन चार वर्षांत आपल्याकडे संशोधन वाढले आहे. संशोधनाबरोबरच विषय नीट कळण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण महत्वाचे आहे. तंत्रनिकेतनांची पुस्तके मराठीतून उपलब्ध केली आहेत. प्रश्नपत्रिका इंग्रजी, मराठी या दोन्ही भाषांत असतील, विद्यार्थ्यांना उत्तरे लिहिण्यासाठी या दोन्ही भाषांचा पर्याय असेल.
आणखी वाचा-प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्राद्वारे पोलीस भरतीत फसवणूक; १० उमेदवारांविरुद्ध गुन्हा
आपल्या देशाची परंपरा किती थोर आहे हे तरुणांच्या मनात रुजवणे आवश्यक आहे. तरुणांच्या मनात परंपरा नसल्याचा न्यूनगंड निर्माण केला आहे. पण आज जग जे वापरते ते आपल्याकडे कसे आधीच होते याची शास्रोक्त माहिती देण्यात येणार आहे. शून्य साली भारताचा व्यापार ३२ टक्के होता. ब्रिटिशांनी देश लुटून नेला तेव्हा तो तीन टक्के झाला. इंग्रज भारतात आले ते जहाज भारतीय बनावटीचे होते. याचे सर्वांचे दाखले आहेत. त्याचा मोठ्या प्रमाणात अभ्यास सुरू आहे. त्यामुळे आपल्या देशाची परंपरा अभ्यासक्रमात आणली जाणार आहे,असेही त्यांनी सांगितले.