संजय जाधव, लोकसत्ता
पुणे: स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष केंद्र सरकारकडून साजरे केले जात आहे. हा मुहूर्त साधत मोदी सरकारने स्वातंत्र्य दिनी देशभरात ७५ वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचे नियोजन केले होते. परंतु, सध्या केवळ २३ एक्स्प्रेस सुरू करण्यात रेल्वेला यश आले आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिनापर्यंतचे ७५ वंदे भारत एक्स्प्रेसचे सरकारचे वेळापत्रक चुकण्याची चिन्हे आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मोदी सरकारकडून अनेक विकासकामे केली जात आहेत. वंदे भारत एक्स्प्रेस हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच प्रत्येक वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करताना पंतप्रधान हिरवा झेंडा दाखविताना दिसतात. स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने सरकारने रेल्वे मंत्रालयाला यंदाच्या स्वातंत्र्य दिनापर्यंत ७५ वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचे उद्दिष्ट दिले होते. मोदी सरकारच्या कामगिरीतील ही ठळक बाब अधोरेखित करण्यासाठी हे नियोजन करण्यात आले. प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ २३ वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात रेल्वेला यश आले आहे.
आणखी वाचा-पुणे: कोरेगाव पार्कमध्ये रशियन दाम्पत्याला मारहाण
भारतात निर्मित झालेल्या सेमी-हायस्पीड ट्रेन-१८ गाड्यांचे नामकरण वंदे भारत एक्स्प्रेस करण्याचा निर्णय मोदी सरकारने जानेवारी २०१९ मध्ये घेतला. पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसला मोदींनी १५ फेब्रुवारी २०१९ रोजी हिरवा झेंडा दाखविला. ही पहिली गाडी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर सुरू झाली. सध्या २४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून २३ वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. गाड्यांच्या निर्मितीचा वेग कमी असल्याने सरकारला ४ वर्षांत केवळ २३ गाड्या सुरू करता आल्या असून, दीड महिन्यात आता सुरू असलेल्या गाड्यांच्या तिपटीपेक्षा अधिक गाड्या सुरू करता येणे शक्य नाही, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.
गाड्या वाढविण्यासाठी डबे कमी
वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या सुरुवातीला १६ डब्यांच्या होत्या. या गाड्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी डब्यांची संख्या कमी करण्यात आली. आता या गाड्या ८ डब्यांच्या आहेत. त्याचबरोबर अनेक वंदे भारत गाड्यांना अपेक्षेपेक्षा कमी गर्दी असल्याने डबे कमी केल्याने त्या चालविणेही रेल्वेसाठी सोईचे ठरू लागले आहे.
वेग केवळ कागदोपत्री जास्त
वंदे भारत एक्स्प्रेसचा वेग ताशी १६० किलोमीटर आहे. प्रत्यक्षात देशातील लोहमार्गांचा विचार करता एकाही मार्गावर ही गाडी या वेगाने धावताना दिसत नाही. अनेक मार्गांवर या गाडीचा वेग इतर गाड्यांएवढाच आहे. काही ठिकाणी या गाड्यांचा सरासरी वेग ताशी ६४ किलोमीटरवर आला आहे, असे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.