‘नाटकातील लोकांनी समाजकारण किंवा राजकारणाकडे वळू नये, हे वैचारिक दारिद्रय़ आहे. या वैचारिक दारिद्रय़ामुळेच आपल्याकडे विविध चळवळी किंवा काम करणारी लोक एकटी पडलेली दिसतात. प्रत्येक समस्येचे केंद्रस्थान असलेल्या स्त्रीच्या समस्या नाटकातून प्रभावीपणे पुढे आल्या पाहिजेत.’ असे मत प्रसिद्ध नाटककार अतुल पेठे यांनी शनिवारी व्यक्त केले.
नारी समता मंचाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘कन्या महाराष्ट्राची’ पुरस्कार प्रदान समारंभात पेठे यांनी आपले विचार मांडले. या वर्षी मुंबई येथील कोरो महिला मंडळ फेडरेशनच्या संस्थापिका मुमताज शेख यांना हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी मंचाच्या सचिव शुभांगी देशपांडे, वीणा भार्गवे आदी उपस्थित होते.
या वेळी पेठे म्हणाले, ‘सामाजिक जडण-घडणीच्या मूळस्थानी स्त्री आहे. सामाजिक समस्यांचे केंद्रस्थानही स्त्रीच आहे. मात्र, तरीही मराठी नाटसृष्टीमध्ये एखादा अपवाद वगळता एकही स्त्री नाटककार झालेली नाही. त्यामुळे नाटकातून समोर आलेली स्त्रीची प्रतिमाही पुरुषाच्या नजरेतून असते. मात्र, आता स्त्रीनेही नाटकाच्या माध्यमातून तिचे प्रश्न मांडण्यासाठी पुढे आले पाहिजे. त्याचवेळी हे लक्षात घेतले पाहिजे, की कला ही समाजकारण आणि राजकारणापासून वेगळे राहू शकत नाही. सामाजिक प्रश्न बिकट होत असताना प्रत्येक चळवळीची एकाकी लढाई सुरू आहे.’
पुरस्काराला उत्तर देताना मुमताज शेख म्हणाल्या, ‘एखाद्या कामासाठी लागणारे बळ किंवा स्वप्न हे त्या कामाशी संबंधित असलेल्या सर्वाचे असावे लागते. मला जे सोबत नेत आहेत, ते माझे प्ररेणास्थान आहेत. आज वस्त्यांमध्ये अशा अनेक मुमताज आहेत, त्यांनाही संधी मिळणे आवश्यक आहे.’
स्त्रियांच्या समस्या नाटकातून प्रभावीपणे पुढे येणे गरजेचे – अतुल पेठे
प्रत्येक समस्येचे केंद्रस्थान असलेल्या स्त्रीच्या समस्या नाटकातून प्रभावीपणे पुढे आल्या पाहिजेत.’ असे मत प्रसिद्ध नाटककार अतुल पेठे यांनी शनिवारी व्यक्त केले.
First published on: 20-07-2014 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nari samata manch atul pethe award