आज पहाटे नाशिक – औरंगाबाद रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातामध्ये एका खासगी बसला लागलेल्या आगाती १३ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. डंपर-खासगी बसच्या अपघातानंतर देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांबरोबरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या दुर्घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे. या अपघातामधील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. मात्र राज्य सरकारने केलेली मदत ही पुरेशी नसल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. पिंपरीमध्ये पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी हे मत व्यक्त केलं.
नक्की वाचा >> “…म्हणूनच एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचं मोठं धाडस केलं”; अजित पवारांनी सांगितलं कारण
नाशिकमधील बस अपघातात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्वीटर हॅण्डलवरुन, “नाशिक- नांदूरनाका येथे खाजगी बसच्या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे,” असं सांगण्यात आलं आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने तातडीचे वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नाशिक येथील अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नक्की वाचा >> BKC मैदानातील दसरा मेळाव्यात लोक भाषणादरम्यान उठून निघून गेल्याच्या Viral व्हिडीओंवर CM शिंदे म्हणतात, “कोणी ते व्हिडीओ…”
अजित पवार यांनीही ट्वीटरवरुन, “यवतमाळहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या खासगी बसला औरंगाबाद-नाशिक मार्गावर अपघात होऊन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. मृत्यू पावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत,” असं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी, “अपघातातील जखमींना वैद्यकीय उपचार व मृतांच्या नातेवाईकांना सरकारनं आर्थिक मदत करावी. अशा अपघातांची पुनरावृत्ती व प्रवाशांचे मृत्यू टाळण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे,” अशीही अपेक्षा व्यक्त केली होती.
सकाळच्या प्राथमिक प्रतिक्रियांनंतर दुपारच्या सुमारास पिंपरीमध्ये प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी शिंदे सरकारकडून देण्यात आलेल्या आर्थिक मदतीमध्ये भेदभाव असल्याचं म्हटलं. “नाशिक बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी पाच लाखांची मदत जाहीर केली. ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे. दहीहंडीत गोविंदाला दहा लाखांची मदत केली होती. मदत देताना अशा प्रकारचा भेदभाव करू नये, नाशिक अपघातात बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांचा काहीही दोष नव्हता,” असे अजित पवार म्हणाले.